तरुण वाघ आठवणीचा पक्काच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2022 05:00 AM2022-03-20T05:00:00+5:302022-03-20T05:00:07+5:30
आपल्याला सहज शिकार कुठे मिळेल असाच विचार करून हा वाघ पवनार शेत शिवारात परतला असावा तसेच तो आठवणीचा पक्काच असल्याचा अंदाज सध्या वनविभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. गुरुवारी ज्या ठिकाणी या तरुण वाघाने कालवड ठार केली त्या परिसरात वनविभागाच्यावतीने ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. पण मागील दोन दिवसांपासून या कॅमेऱ्यांमध्ये हा तरुण वाघ कैद झालेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ नदी-नाल्यांच्या काठाने पवनार ते आंजी (मोठी) शिवारापर्यंतचा प्रवास करणाऱ्या तरुण वाघाने यू-टर्न घेत पुन्हा पवनार शेतशिवार गुरुवारी पहाटेच्या सुमारास गाठले आहे. ज्या ठिकाणी त्याने पूर्वी शेतात बांधून असलेल्या कालवडीची शिकार केली त्याच ठिकाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास या वाघाने येत पुन्हा कालवड ठार केली. आपल्याला सहज शिकार कुठे मिळेल असाच विचार करून हा वाघ पवनार शेत शिवारात परतला असावा तसेच तो आठवणीचा पक्काच असल्याचा अंदाज सध्या वनविभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. गुरुवारी ज्या ठिकाणी या तरुण वाघाने कालवड ठार केली त्या परिसरात वनविभागाच्यावतीने ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. पण मागील दोन दिवसांपासून या कॅमेऱ्यांमध्ये हा तरुण वाघ कैद झालेला नाही. शिवाय गस्त घालत असलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनाही गुरुवारनंतर त्याचे दर्शन न झाल्याने पवनारसह परिसरातील ग्रामस्थांना वनविभागाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सात ट्रॅप कॅमेऱ्यांची नजर
- नैसर्गिक अधिवासाचा शोध घेत असलेल्या या तरुण वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी वनविभगााच्यावतीने आवश्यक सात ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. पण मागील दोन दिवसांपासून या कॅमेऱ्यांत हा तरुण वाघ कैद झालेला नाही. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून पवनारसह परिसरातील नागरिकांना वनविभागाच्यावतीने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय वनविभागाच्या तीन चमू वाघाच्या मागावर आहेत.