मग, गांधींना राष्ट्रपिता म्हणण्याचा दंभ तरी सोडा
By admin | Published: March 16, 2017 12:43 AM2017-03-16T00:43:30+5:302017-03-16T00:43:30+5:30
देशाला फुकटात स्वातंत्र्य मिळालेले नाही वा इंग्रजांनी भेट म्हणूनही दिले नाही. यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला; ....
तुषार गांधी : स्मशान होलिकोत्सवात व्याख्यान
वर्धा : देशाला फुकटात स्वातंत्र्य मिळालेले नाही वा इंग्रजांनी भेट म्हणूनही दिले नाही. यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला; पण आज बनावट लोक स्वत:ला देशभक्त म्हणवून घेत स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहेत. गांधीजींच्या मारेकऱ्यांचे मंदिर बनविण्याचा घाट घातला जात असताना आमचे रक्त खवळत नसेल तर गांधींना राष्ट्रपिता म्हणण्याचा दंभ तरी सोडून द्या, असे भावनिक उद्गार म. गांधी यांचे पणतू आणि ‘लेट्स किल गांधी’ या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक तुषार गांधी यांनी काढले.
अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे स्थानिक स्मशानभूमीत तुषार गांधी मुंबई यांचे ‘गांधी : काल, आज आणि उद्या’ विषयावर व्याख्यान आयोजित होते. या २१ व्या लोकजागर स्मशान होलिकोत्सवातील व्याख्यानात ते बोलत होते. मंचावर नगराध्यक्ष अतुल तराळे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पराग पोटे, अ.भा. अंनिसचे राज्य सल्लागार सदस्य संजय इंगळे तिगावकर, जिल्हाध्यक्ष हरिष इथापे, कार्याध्यक्ष प्रा. सुचिता ठाकरे, संघटक पंकज वंजारे, सचिव निलेश गुल्हाणे उपस्थित होते.
यावेळी तुषार गांधी यांनी अभ्यासपूर्ण मांडणीतून गांधींबाबत विविध माध्यमांतून पसरविल्या जाणाऱ्या अफवा व गैरसमजांचे मूळ संदर्भ देत खंडन केले.
गांधींची हत्या भारत-पाकिस्तान फाळणीमुळे व ५५ कोटी दिल्याने झाली, ही बतावणी साफ खोटी आहे. १९३४ पासून सातवेळा गांधींवर जीवघेणे हल्ले झाले होते, असे तुषार गांधी म्हणाले.
पाच हल्ल्यांमध्ये नत्थुराम गोडसे
तुषार गांधी : स्मशान होलिकोत्सवात व्याख्यान
वर्धा : सन १९३४ मध्ये तर फाळणीचा विषयही नव्हता; पण त्याकाळात गांधींनी हरिजनांसाठी गावातल्या विहिरी खुल्या व्हाव्यात आणि मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा, यासाठी आंदोलन उभारले होते. सेवाग्रामला असताना गांधीजी फाळणी होऊ नये यासाठी जिनांना भेटायला निघाले असतानाही पाचगणीजवळ गांधींवर हल्ला करण्यात आला होता.
गांधींवर झालेल्या सातपैकी पाच हल्ल्यांमध्ये नथुराम गोडसे होता. इतकेच नव्हे तर या हल्ल्यांमध्ये हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांचा सहभाग होता. या सर्व गोष्टींचे पुरावे, कागदपत्र उपलब्ध आहेत. गांधींची हत्या हा सुनियोजित कट होता; पण तो आपला माणूस होता, हे सांगण्याची हिंमत आजही ते करत नाहीत. गांधी हत्येतील खोटेपणा ऐकतच आम्ही मोठे झालो आहोत. आता सत्यही ऐकण्याची आणि पचविण्याची क्षमता ठेवा, असे स्पष्ट व परखड मत तुषार गांधी यांनी मांडले.
पुणे कराराबाबतही अनेक गैरसमज पसरविले जातात. गांधींनी उपोषण सोडावे म्हणून डॉ. आंबेडकरांवर दबाव आणला, हे सत्य नाही. बाबासाहेबांनी आपल्या शोषित समाजाच्या उत्थानासाठी कुणाचीही पर्वा केली नसती; पण त्यावेळी स्वातंत्र्यांचा लढा हा महत्त्वाचा होता. देश स्वतंत्र झाल्यानंतरही आपल्या हक्कांसाठी लढता येईल, ही जाणीव आंबेडकरांना होती. म. गांधींचा विरोध आरक्षणाला नव्हताच. स्वातंत्र्याचे आंदोलन आपसात फूट पाडून तुकड्यांनी लढायचे का, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता.
डॉ. आंबेडकरांनाही गांधीबद्दल निश्चितच आस्था होती. गांधींच्या खून खटल्यावरील सुनावणी सुरू असताना त्याला नियमित उपस्थित राहणारे एकमेव कॅबिनेट नेते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. रेड फोर्ट ट्रायलवर उपस्थितीबाबत त्यांच्या सह्या आहेत. आंतरजातीय लग्नाचे समर्थन करीत शब्द देणारे महात्मा गांधी आपल्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नसल्याने, गांधींच्या मृत्यूपश्चात त्यांचे प्रतिनिधी म्हणून प्यारेलाल यांनी उपस्थित राहावे, असा आग्रह धरणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या मनात गांधींबद्दल जिव्हाळाच होता. गांधी-आंबेडकर असा संघर्ष उभा करून आपण राजकीय नेत्यांच्या खेळीला बळी पडत आहोत, ही खंतही तुषार गांधी यांनी व्यक्त केली.
गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच गांधी आणि भगतसिंग यांच्याबाबत असणाऱ्या गैरसमजांचेही तुषार गांधी यांनी विविध संदर्भ देत स्पष्ट शब्दात खंडन केले. आझाद हिंद सेनेच्या लढवय्या कार्यकर्त्यांना अटक होऊन कोर्ट मार्शल सुरू असताना त्यांच्या बाजूने लढण्याचे निर्देश गांधीजींनी पंंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना दिले होते. कधीकाळी काँग्रेसचे अध्यक्ष असणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी गांधींनीच दिली आहे. नंतरच्या काळात महात्मा गांधींचा फादर आॅफ नेशन अर्थात राष्ट्रपिता, असा प्रथमत: उल्लेख करणारी व्यक्ती म्हणजे सुभाषचंद्र बोस होय. भगतसिंहांना अटक होऊन खटला चालविला जात असताना व्हाईसराय लॉर्ड एडव्हीनला चार वेळा पत्र पाठवून भगतसिंह सच्चा देशभक्त आहे आणि देशाला या तरूणाची गरज आहे, त्याला फाशी देऊ नका, अशी जीवनदानाची भिक गांधींनी मागितली आहे; पण स्वत: भगतसिहांने दयेचा अर्ज करण्यासाठी आपल्या कुटुंबीयांना मनाई करीत फाशी स्वीकारली होती, ही वस्तुस्थितीही त्यांनी मांडली. कोण देशभक्त होते आणि कोण इंग्रजांची माफी मागणारे माफीवीर होते, हेही इतिहासाला माहिती आहे. जे कधीच स्वातंत्र्यलढ्यात नव्हते, जे कधीच नेताजींसोबत वा भगतसिहांसोबतही नव्हते, जे आंबेडकरांच्या परिवर्तनाच्या आंदोलनातही नव्हते, जे इंग्रजांच्या खिशात राहत होते, तेच लोक आज देशभक्तीच्या गोष्टी सांगत राष्ट्रपुरूषांबद्दल अपप्रचार करीत आहेत. एका डोळ्याला सत्य कळत असेल तर दुसऱ्या डोळ्याला असत्यही ओळखता आले पाहिजे. हे जर कळत नसेल तर गांधींना राष्ट्रपिता म्हणण्याचा दंभ तरी सोडून द्या आणि हे नाटक बंद करा, असे उद्विग्न उद्गार काढीत भाऊक झालेल्या तुषार गांधी यांनी शब्दांना विराम दिला.
प्रारंभी तुषार गांधी यांचा परिचय करून देण्यात आला. प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. किरण शेंदरे यांनी तर आभार रवी पुनसे यांनी मानले. व्याख्यानाला विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)