...तर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या लावणार सोक्षमोक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:11 PM2019-05-21T22:11:27+5:302019-05-21T22:11:51+5:30
येत्या २३ मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. १४ टेबलवरून २७ फेºयामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून एखाद्यावेळी एखादे ईव्हीएम सुरू न झाल्यास त्या मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची पडताळणी करून मतमोजणी केली जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येत्या २३ मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. १४ टेबलवरून २७ फेºयामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून एखाद्यावेळी एखादे ईव्हीएम सुरू न झाल्यास त्या मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची पडताळणी करून मतमोजणी केली जाईल. शिवाय ते मतदान गृहित धरले जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी विशेष बैठक पार पडली. यावेळी ते उमेदवार व राजकीय पुढाऱ्यांना मतमोजणीबाबतची माहिती देताना बोलत होते.
जिल्हाधिकारी भिमनवार पुढे म्हणाले, आर्वी, वर्धा व धामणगाव या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी एक अशा तीन मतदान केंद्रावर मॉकपोल पुसला गेला नाही. या तीन केंद्राचे व्हीव्हीपॅट तपासणी करण्यात येईल. सकाळी ७ वाजता उमेदवारांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडण्यात येईल. ईव्हीएम, ई.टी.बी.पी.एस. आणि पोस्टल मतदानाची मतमोजणी एकाच वेळी म्हणजे सकाळी ८ वाजता सुरू होईल. धामणगाव - २७, मोर्शी-२३, आर्वी-२३, देवळी-२४, हिंगणघाट २५ आणि वर्धा-२५ अशा विधानसभा क्षेत्रनिहाय फेºया होणार आहेत. ईव्हीएमची मतमोजणी झाल्यावर लकी ड्रॉ पद्धतीचा अवलंब करून अडीच तासांत व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करण्यात येईल. विधानसभा क्षेत्रनिहाय एक फेरी संपल्यावर लगेच दुसरी फेरी सुरू करण्यात येईल. पूर्वी सर्व सहाही विधानसभा क्षेत्रांच्या फेºया एकाचवेळी सुरू करण्याचे आदेश होते. मात्र, यामध्ये मतमोजणीला अधिक कालावधी लागू शकतो हे लक्षात घेता आयोगाने फेरी संपताच दुसºया विधानसभा क्षेत्राच्या फेरी संपण्याची वाट न बघता दुसरी फेरी सुरू करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत, असेही यावेळी जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी उपस्थितांना भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत वेळोवेळी केलेल्या बदल आणि नियमांची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी निशिकांत सुके, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रवीण महिरे, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रणय जोशी, माधव कोटस्थाने, पवन गोसेवाडे आदींची उपस्थिती होती.
‘अॅप’वर पाहता येणार निकाल
निवडणूक आयोगाने लोकसभेचा निकाल नागरिकांना आॅनलाईन व्होटर हेल्पलाईन अॅप आणि रिझल्ट डॉट ईसीआय डॉट गो डॉट इन या सुविधा अॅपवर तात्काळ दिसणार आहे. लोकांनी मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे.