वर्धेत तब्बल २.२४ लाख दुचाकींची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 09:52 PM2018-05-06T21:52:56+5:302018-05-06T21:52:56+5:30
महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यात वेगळीच ओळख द्यावी लागेल, अशी स्थिती वाहनांच्या संख्येने केली आहे. वर्धा शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या २ लाख ७० हजार ७७४ वर पोहोचली आहे.
गौरव देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यात वेगळीच ओळख द्यावी लागेल, अशी स्थिती वाहनांच्या संख्येने केली आहे. वर्धा शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या २ लाख ७० हजार ७७४ वर पोहोचली आहे. यात दुचाकींची संख्या तब्बल २ लाख २४ हजार ५८३ इतकी आहे. विशेष म्हणजे १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या वर्षभरात वाहन संख्येमध्ये तब्बल २५ हजार ६३९ वाहनांची भर पडली आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने ही आकडेवारी जाहीर केली. मागील वर्षभरात एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ यात दुचाकीच्या संख्येत २१ हजार ४७३ ने वाढ झाली आहे. चार चाकी वाहनांची संख्या १७ हजार ६२५ च्या वर पोहोचली असून त्यात या वर्षात २० हजार ४४ वाहनांची भर पडली. कॅब, रिक्षा, ट्रक, लॉरी आणि डिलीव्हरी व्हॅनच्या संख्येत वाढ झाली आहे. स्कुल बस, रुग्णवाहिका, खासगी बस, ट्रक, ट्रॅक्टर, मालवाहू वाहनांची विक्री मागील वर्षीपेक्षा वाढ झाली आहे. शहरात आॅटो रिक्षांची संख्या ५ हजार ३५ असून १७० ने भर पडली आहे. मिनीबस, स्कूल बस, रुग्णवाहिका, ट्रक, ट्रॅक्टर, डिलेव्हरी व्हॅन, ट्रेलर आणि इतर वाहनांची संख्या २३ हजार १६३ आहे. यात यावर्षी १ हजार ९४६ वाहनांची भर पडली आहे.
वाहनांची नोंदणी
पूर्वी वाहनांची संख्या २ लाख ४५ हजार १३५ होती यात दुचाकी २ लाख ६ हजार ११०, चारचाकी १५ हजार ५८९, इतर वाहने २६ हजार ४४४, या वर्षात एप्रिल २०१७ ते मार्च २०१८, वाहनांची संख्या २५ हजार ६३९ यात दुचाकी २१ हजार ४७३, चारचाकी २ हजार ४४, इतर वाहने २ हजार ११६.
नियमांबाबत उदासीनताच
शहरात वाहनांची संख्या कमालिची वाढत असली तरी वाहतूक नियमाच्या अंमलाकरिता चालकांत मात्र कमालीची उदासिलता आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी आहे.