वर्धा जिल्ह्यात महिनाभरात ३ हजार पोटदुखीचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 02:33 PM2019-05-10T14:33:12+5:302019-05-10T14:34:34+5:30
उन्हाळ्यामुळे पाण्याच्या वेळापत्रकाचे बजेट कोलमडले त्यामुळे साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. एका महिन्यात पोटदुखीच्या आजाराचे ३००० रूग्ण एकट्या आष्टी तालुक्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उन्हाळ्यामुळे पाण्याच्या वेळापत्रकाचे बजेट कोलमडले त्यामुळे साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. एका महिन्यात पोटदुखीच्या आजाराचे ३००० रूग्ण एकट्या आष्टी तालुक्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
टंचाईमुळे पाणीपुरवठा करणारे साधन बदलली आहे. शेवाळयुक्त दुषित, दुर्गधी पाणी पुरवठा केल्या जात आहे. शिवाय पाण्यात तुरटी व ब्लिचिंगचे प्रमाण नगण्य आहे. सध्या उन्हाचा पारा ३५ अंशाच्या वरती गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा घटला आहे. ट्रँकरद्वारे देण्यात येणार पाणी, बैलगाडी किंवा तत्सम साधनाने केल्या जाणारा पाणी पुरवठा हा दुषित स्वरूपाचा आहे. शासनाने पाणी तपासल्यास सर्व नमुने फेल जाण्याची शक्यता दस्तुरखुद्द आरोग्य विभागाने वर्तविली आहे.
अशुद्ध पाणी पुरवठा केल्यामुळे ग्रामीण भागातील आजारांना खतपाणी मिळाले आहे. दोन ते पाच वर्ष वयोगटातील लहान मुलांना जास्त क्षारयुक्त पाणी पिण्यात गेल्यामुळे आजार बळावले आहे. पाणी पिताना त्याचा लोहयुक्त वास येतो तर काही ठिकाणी जास्त जडपणा वाटत आहे. गावागावात शेतातील विहिरीमधील पाणी पिण्यात शेत असल्यामुळे ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात पोटदुखी, हगवण, उलट्या करणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तळेगाव, आष्टी, साहुर, अंतोरा या सर्व भागातील गावात परिस्थिती सारखीच आहे. आरोग्य यंत्रणाकडे पुरेसे संख्या बळ नसल्याने तात्पुरता इलाज करून रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार करून घ्यावा लागत आहे. उन्हामुळे विविध आजारांत झपाट्याने वाढ होत आहे. पाण्याच्या टंचाईमुळे या सर्व आजाराने डोके वर काढले आहे. अशक्तपणामुळे सलाईन घ्यावे लागत आहे. त्या देखील सुविधा मिळत नसल्याने रुग्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावखेड्यातील रुग्णांना तालुकास्थळी यावे लागत असल्याने व त्यातही शासकीय उपचार तोकडा असल्याने यावर कशी मात करायची हा प्रश्न कायम आहे.
आरोग्य यंत्रणा सलाईनवर
ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर, नर्स, कर्मचारी नाही औषध, सलाईन, इजेक्शन साठा नाही. वेळेवर खासगी औषध लिहून दिली जाते. त्यामुळे आरोग्य यंत्रणाच सलाईनवर असल्याने यावर मात कशी करणार जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून आरोग्याची समस्या मार्गी लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आष्टीचे ग्रामीण रुग्णालय डॉक्टर व कर्मचारी नसल्याने वाºयावर आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन डॉक्टर व औषध देत नाही. याला हुकुमशाहीचे धोरण म्हणावे लागेल. याचा आम्ही निषेध करतो, पुन्हा आंदोलन उभारणार.
मकरंद देशमुख, अध्यक्ष, जनशक्ती संघटना, आष्टी (शहीद)