आभास परीक्षणातून ज्ञान विज्ञान होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 09:47 PM2019-02-18T21:47:14+5:302019-02-18T21:47:29+5:30
जोपर्यंत आपण ज्ञानाचे मूळ समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण कोणत्या मार्गाने जात आहोत हे कळणार नाही. निरीक्षणातून आभास, आकलन आणि अनुभूतीच्या परीक्षणातून जे मिळते ते ज्ञान होय. ज्ञानातून जे प्राप्त होते त्याचे परीक्षण केल्यास ते ज्ञान विज्ञान होते, असे प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी राज्यस्तरीय तंत्र परिषदेत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जोपर्यंत आपण ज्ञानाचे मूळ समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण कोणत्या मार्गाने जात आहोत हे कळणार नाही. निरीक्षणातून आभास, आकलन आणि अनुभूतीच्या परीक्षणातून जे मिळते ते ज्ञान होय. ज्ञानातून जे प्राप्त होते त्याचे परीक्षण केल्यास ते ज्ञान विज्ञान होते, असे प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी राज्यस्तरीय तंत्र परिषदेत केले.
अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालय, नागठाणा रोड, सिंदी (मेघे) येथे राज्यस्तरीय एक दिवसीय तंत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या उद्घाटनपर कार्यक्रमाला व्यासपीठावर राणीबाई अग्निहोत्री शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. नारायण मूर्ती, अग्निहोत्री स्कूल आॅफ टेक्नोलॉजीचे प्राचार्य चंद्रकांत कोठारे, अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य अभिषेककुमार सिंह, अग्निहोत्री पोलिटेक्निकचे प्रा. प्रमोद वाळके, प्रा. विजय वाढणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
शंकरप्रसाद अग्निहोत्री पुढे म्हणाले, ज्ञान विज्ञानाची समीक्षा केली तर त्यातून दोन धारा उत्पन्न होतात. एक मनुष्य वर्धक शिक्षा आणि दुसरे तंत्रज्ञान (टेक्नोलॉजी) आहे. आरोग्य वर्धक मध्ये आपल्या जीवनावर होणारे परिणाम, प्रभाव यावर उपाय म्हणजे तंत्रज्ञान. मनुष्याच्या संवर्धनासाठी, विकासासाठी, प्रगतीसाठी, संशोधनासाठी, पाचही तत्त्वाच्या संशोधनासाठी यंत्रज्ञान व तंत्रज्ञान उपयोगी पडते. तंत्रज्ञान सर्वव्यापी आहे. आपल्या अध्ययनातून आभास, अनुभूती, आकलन, कल्पना, परिकल्पना, दर्शन, परिणाम केला पाहिजे. याची संवेदना आपल्यात असली पाहिजे. हेच तत्त्व संशोधनासाठी उपयुक्त असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान प्राचार्य चंद्रकांत कोठारे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य अभिषेककुमार सिंह यांनी केले तर संचालन प्रा. विजय वाढणकर यांनी केले. या राज्यस्तरीय टेक्नॉलॉजी परिषदेला नागपूर, चंद्रपूर, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा येथील विविध महाविद्यालाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.