सांगा... आम्ही शाळेत जायचं तरी कसं? रस्ता, पूल नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्याची आबाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 04:46 PM2022-11-22T16:46:17+5:302022-11-22T17:14:35+5:30
वर्धा जिल्ह्यातील वास्तव : पावसाळ्यात शाळा बंद, आता नदी-नाल्यांतून पायपीट
वर्धा : देशात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. मात्र, अद्यापही ग्रामीण भागातील अनेक गावे, तांडे व वस्त्या मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असल्याने नागरिकांनी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. याचे उदाहरण म्हणजे, जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील हेटी हे गाव होय. गावात रस्ते व पूल नसल्याने पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांची शाळा बुडतेच, त्यानंतरही नदी, नाले ओलांडून शाळा गाठावी लागत आहे.
सुसुंद्रा गावालगतच हेटी हे गाव असून लोकसंख्या शंभरावर आहे. सुसुंद्रा गावापासून हेटीपर्यंतचे अंतर दोन किलोमीटरचे असून, दरम्यान दोन नाले आहेत. हेटीपर्यंत जाण्याकरिता रस्ता नाही. नाल्यांवर पूल नसल्याने पावसाळ्यात सुसुंद्रा आणि हेटी या गावांचा संपर्क तुटतो. हेटी या गावापासून पुढे गेल्यानंतर नदी असून, नदीच्या पलीकडे नागपूर जिल्ह्याची सीमा आहे. हेटी येथील ग्रामस्थांना सुसुंद्रा या गावाकडे येण्यासाठी पक्का रस्ता नाही.
गावातील सुमारे १७ विद्यार्थी सुसुंद्रा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकतात. काही युवक-युवती कारंजा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असून, त्यांना दररोज ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात दोन्ही नाल्यांना पूर राहत असल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाता येत नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गावकऱ्यांनी वारंवार रस्ता व पुलाची मागणी केली, तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
प्रसूतीकरिता तीन महिन्यांपूर्वीच सोडावे लागते गाव
हेटीवासींची पावसाळ्यात मोठी पंचाईत होते. गावात एखादा आजारी पडल्यास त्याला रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागते. एखाद्या महिलेची प्रसूती होणार असेल तर तिला तीन महिने आधीच गाव सोडून नातेवाइकांकडे मुक्कामी पाठवावे लागते. गावात जाण्याकरिता दुसरा रस्ता नसल्यामुळे अडचणीत चांगलीच भर पडली आहे. शेतीकरिता लागणारी खते, बियाणे, औषधी आदी साहित्य पावसाळ्यापूर्वी आणून ठेवावे लागते.
सुसुंद्रा-हेटी गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने नागरिकांच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. गावात आजारी व्यक्ती व गर्भवती महिलांना त्रास सहन करावा लागतो. शेती साहित्य नेण्याची, मुलांना शाळेत जायची अडचण आहे. गावात नागरी सुविधा देण्याची कित्येक वर्षांपासूनची मागणी असून, याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.
- राहुल फुले, उपसरपंच