३० दिवस लोटूनही कृपलानीच्या अवैध कामांवर कारवाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 09:56 PM2018-12-17T21:56:43+5:302018-12-17T21:57:23+5:30
केसरीमल कन्या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कृपलानी बंधूंनी सुरू केलेल्या अवैध हॉटेल बांधकामावर कारवाई करण्याबाबत पालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. पालिकेने हे संपूर्ण बांधकाम अवैध असल्याचे सांगून ३० दिवसात हे बांधकाम तोडण्याबाबत नोटीस बजावला होता. परंतु, अजूनही न.प.ने कारवाई केली नाही. न.प. प्रशासन सुस्त का? असा सवाल अखिल भारतीय वीरशैव संघटनेने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केसरीमल कन्या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कृपलानी बंधूंनी सुरू केलेल्या अवैध हॉटेल बांधकामावर कारवाई करण्याबाबत पालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. पालिकेने हे संपूर्ण बांधकाम अवैध असल्याचे सांगून ३० दिवसात हे बांधकाम तोडण्याबाबत नोटीस बजावला होता. परंतु, अजूनही न.प.ने कारवाई केली नाही. न.प. प्रशासन सुस्त का? असा सवाल अखिल भारतीय वीरशैव संघटनेने केला आहे.
या संघटनेचे जिल्हाप्रमुख सुरेश पट्टेवार यांनी १५ डिसेंबरला या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून याप्रकरणी लक्ष घालण्याबाबत विनंती केली आहे. केसरीमल कन्या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून १०० मिटर क्षेत्र हे शांतता झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. संस्थेच्या परिसरात अवैध हॉटेल सुरू करण्यात येत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या हॉटेल मालकाचा सेलडोह नजीक नागपूर जिल्ह्याच्या सिमेत वडगाव येथे बार आहे. या परिसरात हॉटेल सुरू झाल्यास या परिसरातील सामाजिक जीवनावर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. या परिसरातील रहिवाशांनाही याचा त्रास वाढणार आहे. केसरीमल कन्या शाळेच्या प्रशासनाने याबाबत पालिका व जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले;पण त्यावरही काहीच कारवाई करण्यात आली नाही, हे विशेष.
जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा
पालिका प्रशासनाच्या आशिर्वादामुळे कृपलानी बंधूचे अनेक अवैध बांधकाम शहरात उभी राहीली आहे. पालिकेची यंत्रणा कृपलानीच्या खिश्यात असल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी नाशिक शहरातील अवैध अतिक्रमण हटविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणेच आपला अधिकार वापरून कृपलानीचे बांधकाम तोडावे, अशी मागणी या भागातील शंभर नागरिकांनी केली आहे. या अतिक्रमणाला अभय दिल्या गेल्यास लवकरच मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे, अशी माहिती पट्टेवार यांनी निवेदनातून दिली आहे.
अवाढव्य जनरेटरमुळे प्रदूषणचा प्रश्न ऐरणीवर
कृपलानी बंधूनी येथे अवैध हॉटेल बांधकाम पालिकेच्या नोटीसनंतरही सुरूच ठेवले आहे. या बांधकामाजवळील नाली उघडी करण्याबाबत सूचना केल्यानंतर थातूर-मातूर नाली उघडी करण्यात आली. टायर दुकानासमोरील रॅम अजूनही कायम आहे. त्याखाली नाली आहे, येथे तयार होत असलेल्या हॉटेलसाठी मोठे जनरेटर लावण्यात आले आहे. यात याचा धुर तसेच हॉटेलच्या स्वयंपाकघरातील चिमणीचा धुर यामुळे सुदामपूरी भागातील नागरिकांच्या जिवीतास प्रदूषणाचा धोकाही निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पट्टेवार यांनी या निवेदनात म्हटले आहे. अवैधरित्या महावितरण कंपनीने रस्त्यावरच विद्युत डिपी उभी करून कृपलानीच्या हॉटेलला विद्युत पुरवठा केला आहे. सुदामपुरी भागात सुरुवातीपासूनच तीन विद्युत डिपी उपलब्ध आहे. नवीन डिपीची कुठलीही मागणी नागरिकांनी केली नसताना कृपलानीसाठी विशेष डिपी महावितरणने मंजूर केली आहे. यामुळे विजेच्या ११ केव्ही पुरवठ्यापासूनही नागरिकांच्या जिवीताला धोका आहे.