दहा दिवसांपासून बीपीच्या गोळ्याच नाही
By admin | Published: September 22, 2016 01:13 AM2016-09-22T01:13:58+5:302016-09-22T01:13:58+5:30
६० गावांचा व्याप आणि जवळपास एक लाख लोकसंख्या असलेल्या कारंजा तालुक्यातील ग्रामीण
आजार बळावले : रुग्णांना आर्थिक भुर्दंड
कारंजा(घा.) : ६० गावांचा व्याप आणि जवळपास एक लाख लोकसंख्या असलेल्या कारंजा तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात १० दिवसापासून बी.पी. (रक्तदाब) च्या गोळ्यांचा पत्ताच नाही. परिणामी रूग्णांना बाहेरून गोळ्या आणाव्या लागतात. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
बदलत्या वातावरणामुळे तालुक्यात सर्वत्र संसर्गजन्य आजाराच्या रूग्णात झपाट्याने वाढ झाली आहे. ग्रामीण रूग्णालयात बाह्य रूग्णांची संख्या दररोज ५०० ते ६०० च्या आसपास आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यांतही गर्दी आहे. रूग्णांमध्ये टायफाईड सदृष्य लक्षणे आढळून येत आहेत. त्यातच मागील सहा महिन्यांपासून शासनाकडून बी.पी.च्या औषधीचा (गोळ्यांचा) पुरवठा झाला नसल्याची माहिती आहे. स्थानिक स्तरावर बी.पी.च्या गोळ्यांची खरेदी करून रूग्णांना पुरविण्यात आल्या. परंतु १० दिवसांपासून स्थानिक फंड शिल्लक नसल्यामुळे बी.पी. च्या गोळ्या खरेदी करता आलेल्या नाहीत. विशेष म्हणजे या गोळ्या खरेदी करण्याचे अधिकारही स्थानिक स्तरावर नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
वेळोवेळी सदर औषधीची आॅनलाईन मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. पण पुरवठा झाला नाही. येत्या दोन-तीन दिवसात कमी क्षमतेच्या २.५ एमजी च्या गोळ्या प्राप्त होतील, असेही स्थानिक व्यवस्थापनाने सांगितले.
येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादे हे काही कामाकरिता ३० सप्टेंबर पर्यंत सुट्टीवर आहेत. त्यामुळे डॉ. प्रभाकर वंजारी हे प्रभार सांभाळत आहेत. सर्पदंश व कुत्रा चावल्यावर उपयोगात येत असलेल्या औषधीचा भरपूर साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असले तरी आवश्यक असल्येल्या बीपीच्या गोळ्या उपलब्ध नसल्याने अडचण येत आहे.
शासनाने त्वरित बी.पी. इतर प्रकारच्या आवश्यक औषधीचा पुरेसा पुरवठा करावा. जेणेकरून ग्रामीण भागातील रूग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल व बाहेरून महागडी औषधी विकत घ्यावी लागण्यात नाही अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)