उपवनसंरक्षक कार्यालयात ‘शिवाजी’ची माहितीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:52 AM2019-06-10T01:52:58+5:302019-06-10T01:53:21+5:30
सेलू तालुक्यातील बोर जंगल परिसरात २०१४ पूर्वी वास्तव राहिलेल्या टी-४ ‘शिवाजी’ नामक वाघाची माहितीच उपवनसंरक्षक कार्यालयात नसल्याचे वास्तव जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीअंती पुढे आले आहे. विशेष म्हणजे, २०१२ पासून शिवाजी नामक वाघ बेपत्ता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेलू तालुक्यातील बोर जंगल परिसरात २०१४ पूर्वी वास्तव राहिलेल्या टी-४ ‘शिवाजी’ नामक वाघाची माहितीच उपवनसंरक्षक कार्यालयात नसल्याचे वास्तव जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीअंती पुढे आले आहे. विशेष म्हणजे, २०१२ पासून शिवाजी नामक वाघ बेपत्ता आहे. शिवाय तो बेपत्ता असल्याचा विषय ‘लोकमत’ने २६ फेबु्रवारीला ‘बाजीरावशी झुंज देणारा शिवाजी बेपत्ता’ या मथळ्याखाली वृत्तप्रकाशित करून उजेडात आणला होता. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी हा वाघ नेमका कुठे आहे, याची माहिती घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
शिवाजी नामक वाघाचे दर्शन २०१२ मध्ये गरमसूरच्या पलीकडील जंगलात काही नागरिकांना झाले होते. शिवाय, तो वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरातही कैद झाल्याचे बोलले जाते. असे असले तरी हा वाघ मागील काही वर्षांपासून बेपत्ताच आहे. परिणामी, त्याचे वास्तव्य सध्या कुठल्या परिसरात आहे किंवा त्याची शिकार तर झाली नाही ना, असे अनेक प्रश्न वन्यजीव अभ्यासकांकडून सध्या उपस्थित केले जात आहे. २६ फेब्रुवारी २०१९ ला प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते विकास दांडगे यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून या प्रकरणी लक्ष देण्याची विनंती केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी उपवनसंरक्षक कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. तेव्हा उपवनसंरक्षक कार्यालयात टी-४ शिवाजी नामक वाघाची माहितीच नसल्याचे पुढे आले आहे. तसे लेखी पत्रही ३१ मे २०१९ रोजी उपवनसंरक्षकांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे.
शिवाय पुढील कार्यवाहीसाठी पत्राची एक प्रत विभागीय वन अधिकारी, बोर व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांना पाठविण्यात आली आहे. पुढे हे प्रकरण काय वळण घेते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
२०१२ नंतर दर्शन नाहीच
बोर अभयारण्याला बोर व्याघ्र प्रकल्प म्हणून २०१४ मध्ये घोषित करण्यात आले. त्यावेळी वाघांची सहज ओळख पटावी म्हणून त्यांना नावही देण्यात आली. त्यावेही अंबिका नामक वाघिणीला बीटीआर टी-१, बाजीराव नामक वाघाला बीटीआर टी-२ तर कॅटरिना नामक वाघिणीला बीटीआर टी-३ असे नाव देण्यात आले. शिवाय, शिवाजी नामक वाघाला बीटीआर टी-४ नाव देण्यात आले होते. परंतु, सध्या त्याची नोंदच नसल्याचे बोलले जात आहे. शिवाय २०१२ पासून त्याचे दर्शनही झाले नसल्याचे सांगण्यात येते.