प्रशासनात चालढकल चालणार नाही
By Admin | Published: June 3, 2015 02:15 AM2015-06-03T02:15:54+5:302015-06-03T02:15:54+5:30
यापूढे प्रशासनात चालढकल खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक कामात वेळेची मर्यादा पाळा. कोणती कामे करायची, ...
आशुतोष सलील : जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा
वर्धा : यापूढे प्रशासनात चालढकल खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक कामात वेळेची मर्यादा पाळा. कोणती कामे करायची, कुणी करायची आणि किती दिवसांत करायची, हे नियोजित असायला हवे. यापुढे केवळ कागदावरील कामे चालणार नाही. जमत नसेल तर तेसुद्धा सांगा, अशा शब्दात नवे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. जलयुक्त शिवार अभियानातील कामे ३० जूनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्हाधिकारी सलील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी जलयुक्त शिवार अभियानातील कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांना अधिकाऱ्यांमध्ये असलेला असमन्वय चांगलाच खटकल्याचे समजते. याप्रसंगी जलयुक्त शिवारची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना २१४ गावांत प्रशासकीय मान्यता दिलेली कामे पूर्ण करण्यासंदर्भात निर्देश दिलेत. बैठकीला जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मिना, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे तसेच समितीचे सदस्य माधव कोटस्थाने प्रामुख्याने उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात राज्य जलसंधारण विभाग, जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभाग, कृषी विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, वन विभाग तसेच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेतर्फे २ हजार २७२ कामे घेण्यात येणार आहे. १ हजार ७३६ कामे पूर्ण झाली तर ५३६ कामे प्रगतिपथावर आहेत. गावनिहाय सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या जलसंधारणाच्या कामांबाबत संपूर्ण माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी सलील यांनी दिल्यात. शिवाय संपूर्ण विभागाची माहिती संकलनामध्ये समानता असावी, अशी सूचना करण्यासही ते विसरले नाहीत.(जिल्हा प्रतिनिधी)
गुणवत्ता तपासण्यासाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्याचे निर्देश
जलयुक्त शिवार अभियानात तालुका तसेच जिल्हास्तरावर समितीचे गठण करून या समितीमार्फत जिल्ह्यातील संपूर्ण कामांची एकत्रित माहिती सादर करावी, अशी सूचना करताना या अभियानासाठी ४५ कोटी ६८ लाखांचा निधी प्राप्त झाला असून यात विशेष अनुदान जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधूनही निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कामाचा दर्जा व गुणवत्ता त्रयस्त संस्थेमार्फत तपास व मूल्यमापन करण्यासाठी संस्थेची नियुक्ती त्वरित करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
जलयुक्त शिवार अभियानात राज्य जलसंधारण विभागात ७० कामे प्रस्तावित करण्यात आली असून केवळ २५ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे येत्या दोन दिवसात सुरू करावीत, अशा कडक शब्दात सूचनाही त्यांनी दिल्यात.
जि.प. लघुसिंचन विभागातर्फे साखळी सिमेंट नालाबांधची १०७ कामे घेण्यात येणार आहे. कृषी विभागातर्फे नाला खोलीकरण व ढाळीचे बांध, अशी ३०८ कामे, वनविभागाची ८३ कामे, पाणी पुरवठा विभागाच्या ७७ कामांना विशेष निधीतून मान्यता देण्यात आली आहे. सिंचन विभागाच्या ठिबक व तुषार सिंचनाच्या ११६० कामांचाही कार्यक्रमात समावेश आहे.
भूजल सर्व्हेक्षण विभागातर्फे भूमिगत सिमेंट बंधारा, नाला ट्रेंच तसेच रिचार्ज शाफ्टची ४८ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. लोकसहभागातून तसेच सीएसआर फंडातून जिल्ह्यात अधिकाधिक कामे पूर्ण करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.