गणेशोत्सवाच्या नावावर प्रदूषण नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 10:23 PM2017-08-25T22:23:57+5:302017-08-25T22:24:15+5:30
महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणेशाची आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांकडून स्थापना झाली.
श्रेया केने।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणेशाची आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांकडून स्थापना झाली. बाप्पाच्या आगमनानिमित्त गणेशोत्सवाचे स्वरूप जाणून घेण्याकरिता ‘लोकमत’च्यावतीने ‘आपल्या कल्पनेतील सार्वजनिक गणेशोत्सव’ हा सर्व्हे करण्यात आला. वर्धेत नागरिकांचा कल गणेशोत्सवात सामाजिक उद्देशाचा दिसला तर ९० टक्के लोक गणेशोत्सवादरम्यान होणाºया ध्वनी, वायू व जल प्रदूषणाच्या विरोधात असल्याचे दिसून आले.
शहरातील अनेक ठिकाणी चौकात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दहा दिवस चालणाºया या उत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला. यानिमित्त ‘लोकमत’च्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकूण १० प्रश्न विचारण्यात आले. प्राथमिक स्वरूपात असलेल्या शंभर नागरिकांकडून सर्व्हेचा अर्ज भरून घेण्यात आला. हे सर्वेक्षण करताना काही ठिकाणी गणेशोत्सवाच्या नावावर होत असलेल्या गोंधळाला नागरिकांकडूनही विरोध असल्याचे दिसून आले. विनाकारण होत असलेला आवाज आणि युवकांचा हुल्लड यामुळे या उत्सवाचे सामाजिक महत्त्व कमी होत असल्याच्या प्रतिक्रीया अनेकांकडून भरलेल्या अर्जातून उमटल्या.
शासनाच्यावतीने नुकताच डिजेच्या आवाजावर प्रतिबंध लावण्यात आला. हा प्रतिबंध योग्य असल्याचे ९० टक्के नागरिक म्हणत आहेत. गणेशोत्सवानंतर होत असलेल्या विसर्जनातून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. यातून सुटका करण्याकरिता पर्यावरणपुरक गणेशोत्सव व्हावा असेही ९० टक्के नागरिकांनी त्यांच्या अर्जातून स्पष्ट केले आहे. उत्सवादरम्यान होत असलेली आतिषबाजी आणि त्यातून होणारे वायू प्रदूषण टाळावे असे ८५ टक्के नागरिकांनी या सर्वेक्षणातून म्हटले आहे.
एक गाव एक गणपतीला अनेकांची पसंती
शासनाच्यावतीने ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना अंमलात आणली. या संकल्पनेला प्रारंभी प्रतिसाद मिळाला. कालांतराने त्यात फरक पडला. ही संकल्पना पुन्हा उदयास येत आहे. ही संकल्पना नागरिकांना पटली असून त्यांच्याकडून हा प्रकार प्रत्येक गावात व्हावा असा कल दिसून आला. या सर्वेक्षणात ७० टक्के नागरिकांनी या संकल्पनेला पसंती दिल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
हरविलेला सामाजिक उद्देश कायम असावा
गणेशोत्सव मुळातच धार्मिक नाही तर सामाजिक उद्देशाने उदयास आला आहे. मात्र आज त्याला धार्मिक रंग चढत आहे. टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जनजागृतीकरिता मोठ्या प्रमाणात या उत्सवाला चालना दिली होती. आज तो रंग हरवित असून त्याच उद्देशाने हा उत्सव साजरा होण्याची अनेकांची अपेक्षा दिसून आली.
उत्सवादरम्यान होणारा अनावश्यक खर्च टाळा
गणेशोत्सवादरम्यान अनेक बाबींवर अनावश्यक खर्च होत आहे. यातूनच डीजे, फटाके यासारखे प्रकार घडतात. आता शासनाने वर्गनीपैकी १० टक्के रक्कम सामाजिक संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मंडळांनी उत्सवारदम्यान होणारा अनावश्यक खर्च टाळावा, अशा प्रतिक्रीया अनेकांकडून उमटल्या आहेत.