वर्धा जिल्ह्यातील गोदामात जागा नाही; शेतमाल खरेदी वांध्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 02:45 PM2020-06-18T14:45:40+5:302020-06-18T14:46:09+5:30
शासनाने निर्धारित केलेली गोदाम फुल्ल झाल्याने सध्या जिल्ह्यात कापूस खरेदीला ब्रेक लागले आहे तर नाफेडची चणा खरेदी बंद होण्याच्या मार्गावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास दीड महिना कापूस खरेदी ठप्प राहिल्याने आता पावसाळ्याच्या तोंडावर कापूस खरेदी अडचणीत आली आहे. कापसाशिवाय चणा विक्रीची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शासनाने निर्धारित केलेली गोदाम फुल्ल झाल्याने सध्या जिल्ह्यात कापूस खरेदीला ब्रेक लागले आहे तर नाफेडची चणा खरेदी बंद होण्याच्या मार्गावर आहे.
वर्धा जिल्ह्यात कापूस व सोयाबीन हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असून यावर्षी २२ मार्चनंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील व्यवहार ठप्प झाला. कापसाची सुरू असलेली खरेदी बंद पडली. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विकता आला नाही. त्यानंतर लॉकडाऊन शिथील झाल्यावर कापूस खरेदीचे काम सीसीआय व व्यापाऱ्यांकडून सुरू करण्यात आले. मात्र, सीसीआयचा भाव ५ हजार ३०० रुपये क्विंटलवर असल्याने अनेकांनी सीसीआयलाच कापूस देण्यास पसंती दाखविली. दरम्यान, अनेक जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीतील परप्रांतीय मजूर बाहेरगावी निघून गेले. त्यामुळे कापूस खरेदीचे कामही रेंगाळले. जिनिंगमध्ये असलेल्या कापूस गाठी आणि सरकी ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पावसाचे कारण पुढे करीत जिल्ह्यातील मोठ्या बाजार समितीतील कापूस खरेदी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. व्यापाऱ्यांकडे ४ हजार ३०० रुपये भाव आहे. तशीच परिस्थिती हरभरा व तूर खरेदीची आहे. अद्याप हरभरा व तूर शेतकऱ्यांकडे पडून आहे. बºयाच ठिकाणी जागा नसल्याचे कारण देत ही खरेदी थांबविण्यात आली आहे. पालकमंत्री सुनील केदार यांनी येत्या पंधरा दिवसात ही खरेदी आटोपा, अशा सूचना दिल्या आहेत.
दोन हजार शेतकऱ्यांकडून ३४ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी
जिल्ह्यात एकूण ११ हजार १४७ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नाफेड व महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी केली आहे. त्यापैकी २ हजार ४५८ शेतकऱ्यांकडील हरभऱ्याची विक्री झाली असून आतापर्यंत ३४ हजार ६७७ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.
कापूस चौकशीचा ससेमिरा
शेतकऱ्यांची अडचण लक्षात न घेता सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार खात्याकडून दररोज चौकशीला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे कापूस विक्रीची चिंता, तर दुसरीकडे चौकशीचा ससेमिरा या दुहेरी संकटात सध्या शेतकरी सापडला आहे. सीसीआयची कापूस खरेदी बंद झाल्यास व्यापारी भाव पाडतील, या भितीने शेतकरी कापूस कसा विकावा, या विवंचनेत आहेत.
जिल्ह्यात जिनिंगमध्ये असलेल्या कापूस गाठी आणि सरकी ठेवण्यासाठी खासगी तसेच औद्योगिक विकास महामंडळामध्ये रिकामी असलेली गोदामे शोधून ती सीसीआयला सरकी आणि गाठी ठेवण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
- सुनील केदार, पालकमंत्री, वर्धा जिल्हा.