‘जगाच्या पाठीवर गांधीजींसारखी लोकलढा उभारणारी व्यक्ती झाली नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 02:30 AM2017-08-09T02:30:24+5:302017-08-09T02:31:03+5:30

क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला या पवित्र भूमीत आपण आलो आहो. ‘चले जाव’चा नारा याच भूमीतून गांधीजींनी देशवासीयांना दिला.

'There is no such person as Gandhiji's place on the back of the world' | ‘जगाच्या पाठीवर गांधीजींसारखी लोकलढा उभारणारी व्यक्ती झाली नाही’

‘जगाच्या पाठीवर गांधीजींसारखी लोकलढा उभारणारी व्यक्ती झाली नाही’

googlenewsNext
ठळक मुद्देसुरेश द्वादशीवार : ‘आॅगस्ट क्रांती दिन चले जाव’ विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला या पवित्र भूमीत आपण आलो आहो. ‘चले जाव’चा नारा याच भूमीतून गांधीजींनी देशवासीयांना दिला. अहिंसेच्या माध्यमातून लोकशक्ती निर्माण करून न्याय, समता, शांती प्रस्थापित करण्यासाठी जीवन समर्पित केले. गांधीजींच्या आवाहनावर प्रचंड शक्तीनिशी देशवासी उभे राहत होते. जगाच्या पातळीवर गांधीजींसारखी लोकलढा उभारणारी व्यक्ती आजपर्यंत झाली नाही, असे मत जेष्ठ पत्रकार व लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.
गांधी १५० जयंती अभियानांतर्गत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानद्वारे यात्री निवासच्या आचार्य दादा धर्माधिकारी सभागृहात आॅगस्ट क्रांती चलेजाव अमृतवर्ष सभा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आश्रमाचे अध्यक्ष जयवंत मठकर, माजी अध्यक्ष अ‍ॅड. मा.म. गडकरी उपस्थित होते. गांधीजींच्या प्रतिमेला द्वादशीवार यांनी सूतमाळ अर्पण केल्यानंतर खादी शाल, सूतमाळ व खादी वस्त्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
द्वादशीवार पूढे म्हणाले की, स्वराज्यातून सुराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण आयुष्य मावळ्यांना सोबत घेऊन महाराज लढले. लढत राहिले; पण महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी राजेही १७ वर्षे औरंगजेबाशी लढले. ते फक्त शिवाजी महाराजांच्या प्रेरणेमुळेच! जगाच्या इतिहासानेही याची दखल घेतली. १९४२ चा लढा हा सर्वात मोठा होता. सबंध देश एकजूट झाला होता. प्रत्येक जण स्वातंत्र्यासाठी मरायला तयार होता आणि या मागे गांधीजींची पे्ररणा, शक्ती होती. कुठलाही अधिकार नाही, सत्ता नाही, नंगा फकीर होते; पण लोकांचा प्रचंड विश्वास गांधीजींवर होता. यामुळेच अहिंसेचे तत्त्व आंदोलनात दिसते. गांधीजींचे जीवन तत्त्व व मूल्यावर आधारित होते. यामुळे अहिंसेची लोकशक्ती यशस्वी झाली.
सावरकर अंदमानात असताना त्यांच्या मुक्ततेसाठी गांधीजींनी प्रयत्न केले. शत्रूशी मैत्री करण्याची शिकवण बापूंनी कार्यकर्त्यांना दिली; पण सावरकरांनी गांधीद्वेष कायम जपला. इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली होती. ती चुकीची होती; पण कायदा व संविधानाच्या चौकटीत. हल्लीच्या सरकारमध्ये ते मूल्य दिसत नाही.
सरकार टोळीप्रमाणे कार्य करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींच्या मागे तरूण वर्ग होता. हा वर्ग विचार, मूल्य आणि कृतीवर प्रेरित झाला होता. आज गांधीजींचे विचार, मूल्य तरूणांपर्यंत पोहोचविलेच जात नाही. यामुळे तरूण गांधी विचारांपासून दूर आहे. आश्रम व परिसराचे विचार व मूल्य जपण्याचे दायित्व आहे. महान आत्म्याचे स्मरण या दिवशी सर्वांना प्रेरणा ठेणारे ठरेल, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक जयवंत मठकर व संचालन प्रशांत गुजरकर यांनी केले तर आभार डॉ. सोहम पंड्या यांनी मानले.

Web Title: 'There is no such person as Gandhiji's place on the back of the world'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.