जिल्ह्यात तीन दिवस पुरेल एवढाच लससाठा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 05:00 AM2021-04-09T05:00:00+5:302021-04-09T05:00:12+5:30
जिल्ह्यात लसीकरणाचे पात्र लाभार्थी वाढताना दिसताच लसीकरण केंद्रही वाढविण्यात आली आहेत. बारा केंद्रांपासून सुरुवात होऊन सध्या ८१ लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. येथे आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जात आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने जिल्हा प्रशासनाकडून लसीकरण केंद्र वाढवून नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा संसर्ग रोखण्या करिता नागरिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढविणे महत्त्वाचे असल्याने शासनाकडून लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात १५ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली असून, जिल्हा प्रशासनाकडून शहरासह ग्रामपातळीवरही जनजागृती केली जात असल्याने लसीकरणाचा वेग वाढला आहे. परिणामी जिल्ह्यात तीन दिवस पुरेल इतकाच लससाठा उपलब्ध असून, नव्याने मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. लससाठा वेळीच उपलब्ध झाला नाही तर लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात लसीकरणाचे पात्र लाभार्थी वाढताना दिसताच लसीकरण केंद्रही वाढविण्यात आली आहेत. बारा केंद्रांपासून सुरुवात होऊन सध्या ८१ लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. येथे आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जात आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने जिल्हा प्रशासनाकडून लसीकरण केंद्र वाढवून नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपविली आहे. सोबतच शासनाने लॉकडॉऊन जाहीर केले असून, या दिवसांत रेकॉर्डब्रेक रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांनीही हाता लसीकरण केंद्राकडे धाव घेतली आहे. परिणामी काही केंंद्रांवर लसीकरणाचा तुटवडा जाणवायला लागला आहे. शहरातील लेप्रसी फाऊंडेशन येथील केंद्रावर गुरुवारी सकाळी लस घेण्याकरिता गेलेल्यांना पहिला डोस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने त्यांना माघारी परतावे लागले. असा प्रकार इतरही केंद्रांवर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोव्हॅक्सिन दुसऱ्या डोसकरिता राखीव
ज्या व्यक्तींनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला असेल त्याला दुसरा डोजही कोव्हॅक्सिनचाच द्यावा लागतो. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचा तुटवडा आहे. सध्या कोव्हॅक्सिनचे ३ हजार ५९० डोस शिल्लक आहेत.
त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून पहिला डोस घेतलेल्यांची दुसऱ्या डोसकरिता अडचण होऊ नये म्हणून कोव्हॅक्सिन राखीव ठेवली आहेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. आता नवीन लससाठा येईपर्यंत नागरिकांना कोविशिल्डचाच डोज घ्यावा लागणार आहे. नागरिकांनीही उपलब्ध असलेली लस घेऊन कोरोनापासून आपला बचाव करण्याची गरज आहे. शासनाकडे लसीची मागणी करण्यात आली असून त्यांच्याकडून कधी लसींचा पुरवठा केल्या जातो, याकडे आता लक्ष राहणार आहे.
जिल्ह्यात सध्या कोविशिल्डचे २८ हजार ४००, तर कोव्हॅक्सिनचे ३ हजार ५९० डोस शिल्लक असून, बुधवारी झालेल्या लसीकरणाच्या अंदाजावरुन तीन दिवस पुरेल इतका लससाठा उपलब्ध आहे. सर्व लससाठा लसीकरण केंद्राला पुरविण्यात आला आहे. तसेच कोविशिल्डचे २ लाख, तर कोव्हॅक्सिनचे ४ हजार डोस मागविण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त कोव्हॅक्सिनचे ३ हजार डोस आधीच मंजूर झाले आहेत. कुठे तुटवडा असेल तर त्या केंद्रावर दुसऱ्या केंद्रावरील लस पुरविली जात आहे. त्यामुळे सध्या तरी कुठेच अडचण आलेली नाही.
डॉ. प्रभाकर नाईक, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. वर्धा