नाल्याला आला अचानक पूर आणि घडले अघटित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:13 PM2020-07-04T12:13:45+5:302020-07-04T12:14:34+5:30
वर्धा जिल्ह्यातील वायगावजवळ सोनेगाव-मीरापूर नाल्याजवळच्या शेतात काम करणाऱ्या महिलांवर मोठा प्रसंग गुदरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: शेतातले काम संपवून त्या घराकडे निघाल्या होत्या. वाटेत पुलावरून जात असताना असे काही घडले की त्यांनी कल्पनाही केलेली नव्हती. जिल्ह्यातील वायगावजवळ सोनेगाव-मीरापूर नाल्याजवळच्या शेतात काम करणाऱ्या महिलांवर मोठा प्रसंग गुदरला.
शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास आपली शेतातील कामे आटोपून काही महिला घरी परत यायला निघाल्या. वाटेत पूल लागला. पुलवार फारसे पाणी नव्हते. मात्र पूल ओलांडत असताना एकाएकी नाल्यातील पाण्याची पातळी वाढली आणि प्रवाह वेगवान झाला. त्या वेगाने तीन महिला पाण्यात लोटल्या गेल्या. त्यांचा आरडा ओरडा ऐकून जवळपासचे लोक धावले. त्यांना बाहेर काढले व तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दोघींनी आपले प्राण गमावले होते तर तिसरी गंभीर होती. चंद्रकला दिनेश लोटे (४५), बेबी चिंतामण भोयर (४५) अशी मृत महिलांची नावे आहेत तर वशाली बावने (३५) ही महिला गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या पुलावर लोखंडी कठडे बांधण्याबाबत अनेकदा प्रशासनाला निवेदन दिले मात्र त्याकडे लक्ष दिले गेले नाही. तातडीने या पुलावर कठडे बांधण्यात यावेत अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अतुल बावने यांनी केली आहे.