धर्माच्या नावावर आर्वी शहरात कधीही दंगे झाले नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:10 AM2018-03-28T00:10:19+5:302018-03-28T00:10:19+5:30
धर्माच्या नावावर शहरात कधीच दंगे झाले नाही. देशातील आतंकवाद संपविण्याकरिता तेलंगराय देवस्थानापासून प्रेरणा घेतली पाहिजे, असे मत सुधीर दिवे यांनी व्यक्त केले.
ऑनलाईन लोकमत
आर्वी : धर्माच्या नावावर शहरात कधीच दंगे झाले नाही. देशातील आतंकवाद संपविण्याकरिता तेलंगराय देवस्थानापासून प्रेरणा घेतली पाहिजे, असे मत सुधीर दिवे यांनी व्यक्त केले.
यंग मुस्लीम वेलफेअर असो. च्या वतीने गांधी चौकात आतंकवाद विरोधी परिषदेद्वारे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते सत्काराला उत्तर देत होते. ते पूढे म्हणाले की, सर्व धर्म, पंथ व जातीचे लोक एकाच ठिकाणावर नतमस्तक होऊन एकतेचा संदेश देणाऱ्या तेलंगराय बाबांच्या कर्मभूमीत माझा जन्म झाला. याच ठिकाणी असलेल्या दर्ग्यालगत माझा सत्कार करण्यात आला, हे भाग्य समजतो. शासकीय सेवेत असताना १९९१ साली मी नागपूर तहसीलदार म्हणून कार्यरत असताना महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते देशातील उत्कृष्ट शासकीय अधिकारी म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. त्यापेक्षाही मोठा आनंद आज माझ्या कर्मभूमीत झालेल्या सत्कारामुळे झाल्याचेही दिवे यांनी सांगितले.
आतंकवाद हा देश आणि मानव समाजाकरिता धोका आहे, या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलरत्न पुरस्कार प्राप्त रमेशचंद्र राठी तर अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे उपस्थित होते.
जळगाव खानदेश येथील प्रसिद्ध वक्ते डॉ. गारीब अहमद म्हणाले की, विविधतेने नटलेल्या भारत देशातील सर्व जाती, पंथात सकारात्मक भावना निर्माण झाली तर एकोपा वाढेल. मानव समाजाकरिता घातक असलेल्या आतंकवाद देशातूनच नव्हे तर जगातून समाप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आतंकवाद म्हटला की एका समाजाचे नाव पुढे येते; पण देशाची फाळणी झाल्यापासून त्या समाजाची नाळ भारत देशासोबत जुळली आहे, हे का विसरत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ही द्वेशभावना निर्माण करण्याकरिता प्रसार माध्यमातून प्रसारित होणारी नकारात्मक भूमिका कारणीभूत असून त्यावर प्रतिबंध घातला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी विशेष कार्य. अधिकारी केंद्रीय मंत्री जलसंपदा नदी विकास व गंगा पुनर्जीवन सुधीर दिवे, समाजसेवक श्रीधर ठाकरे, अभियंता निलेश गायकवाड, तहसीलदार विजय पवार, ठाणेदार अशोक चौधरी यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचालन वेलफेअरचे अध्यक्ष नजीर खान रिजवी यांनी केले. कार्यक्रमाला परवेज अहमद साबीर, मोहम्मद अगाजउद्दीन, मोहम्मद एजाज अंसारी, मोहम्मद सरफराज नागोरी, अब्दुल रफीक, सदस्य आरिफ नागोरी, ईस्माईल खान, शेख कलीम कुरेशी, शेख जब्बार, सैय्यद जुबरे, रिजवान अहमद, शेख समीर, मिर्झा अश्पाक बेग यांनी सहकार्य केले.