इंदिरा गांधींसारखे कणखर नेतृत्व होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:44 AM2017-11-23T00:44:05+5:302017-11-23T00:44:42+5:30
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या धनी होत्या. संगीत, कला, वाचन, लिखान, राजकारण आदी अनेक बाबतीत त्यांचे व्यक्तीमत्त्व प्रभावी होते.
ऑनलाईन लोकमत
आर्वी : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या धनी होत्या. संगीत, कला, वाचन, लिखान, राजकारण आदी अनेक बाबतीत त्यांचे व्यक्तीमत्त्व प्रभावी होते. त्यांच्या अनेक निर्णयांमुळे त्या सर्वसामान्यांमध्ये कायम नाळ जोडून राहिल्या. त्यांच्यासारखे नेतृत्त्व भविष्यात होणार नाही, असे प्रतिपादन राकाँचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.
इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यान मालेत ते बोलत होते. सदर कार्यक्रम डॉ. शरदराव काळे स्मृती व्याख्यानमालेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष डॉ. वसंत गुल्हाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून नंदकिशोर दिक्षित, आ. अमर काळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आव्हाड पुढे म्हणाले की, इंदिरा गांधी यांचा १९७७ ते १९८० या काळात निवडणुकीत पराभव होवूनही त्या खचल्या नाही. त्यांनी पक्षाला नवी उभारी दिली आणि पुन्हा अधिपत्य निर्माण केले. भारताला औद्योगीक दृष्ट्या प्रगत करण्याचे काम त्यांनी केले. बांगला देशाची निर्मिती त्यांच्या पुढाकाराने झाली. १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचे काम करताना गरीब मानसाला बँकींग व्यवस्थेशी जोडून घेण्याचे काम त्यांनी केले. दहशतवादाच्या विरुद्ध त्यांनी कायम संघर्ष केला. १९८० च्या दशकात त्यांनी पंजाबातील दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आॅपरेशन ब्लू स्टार केले. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. खलीस्थानची चळवळ त्यांनी मोडून काढली असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी इंदिरा गांधी यांच्या राजकीय जीवनातील विविध पैलूंवर आव्हाड यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यापूर्वी सकाळी स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात आ. अमर काळे व मित्रपरिवारांच्यावतीने रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. व्याख्यान मालेचे प्रास्ताविक आ.अमर काळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अविनाश गोहाड यांनी केले. या कार्यक्रमाला आर्वी विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेकरिता अमर काळे मित्र मंडळाच्या सदस्यांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.