दागिने चमकविण्यास आले अन् दागिने घेऊन पसार झाले, सोन्याच्या बांगड्या लंपास
By चैतन्य जोशी | Published: September 24, 2022 05:55 PM2022-09-24T17:55:12+5:302022-09-24T17:55:27+5:30
आम्ही कंपनीतून आलेलो आहे, तुमच्याकडील चांदीचे व सोन्याचे दागिने चमकावून देतो, असे सांगून घरात आलेल्या अज्ञात दोघांनी महिलेकडील दोन सोन्याच्या बांगड्या चोरुन नेत पळ काढून फसवणूक केली.
वर्धा :
आम्ही कंपनीतून आलेलो आहे, तुमच्याकडील चांदीचे व सोन्याचे दागिने चमकावून देतो, असे सांगून घरात आलेल्या अज्ञात दोघांनी महिलेकडील दोन सोन्याच्या बांगड्या चोरुन नेत पळ काढून फसवणूक केली. ही घटना नेहरु वॉर्ड हिंगणघाट येथे घडली. याप्रकरणी २३ रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सुरेश नानप्पा कापसे (८०) व त्यांची पत्नी शोभा हे वयोवृद्ध जोडपे घरी असताना दोन अज्ञात व्यक्ती घरी आले. त्यांनी आम्ही उलाला कंपनीकडून आलो असून सोन्या चांदीचे दागिने साफ करुन चमकावून देतो, असे म्हणत पांढऱ्या रंगाचे पावडर काढून त्यांच्याकडील चांदीच्या समया साफ करुन दिल्या.
तसेच वृद्धेच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या काढून लाल रंगाच्या पावडरच्या पाण्यात टाकल्या आणि डब्याचे झाकन बंद करुन थोडावेळ गैसवर गरम करा असे सांगितले. नंतर एका व्यक्तीने बैगमधून नोटबूक काढून त्यावर सुरेश कापसे यांच्या स्वाक्षरी घेतल्या आणि आम्ही साहेबांकडुन पावडर घेऊन येतो, असे सांगून दोघेही घराबाहेर निघाले. शोभा कापसे यांनी डब्याचे झाकण काढून बघितले असता ५० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरुन नेलेल्या दिसून आल्या. आरोपींनी वयोवृद्ध दाम्पत्याची फसवणूक करुन सोन्याच्या बांगड्या चोरुन नेल्याची तक्रार त्यांनी हिंगणघाट पोलिसात दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.