‘ते’ वयोवृद्ध दाम्पत्य श्रावणबाळ योजनेत
By admin | Published: December 25, 2016 02:24 AM2016-12-25T02:24:10+5:302016-12-25T02:24:10+5:30
घरी उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने हेटी येथील वयोवृद्ध दाम्पत्य भिक्षा मागून पोट भरत होते.
आकोली : घरी उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने हेटी येथील वयोवृद्ध दाम्पत्य भिक्षा मागून पोट भरत होते. श्रावणबाळ योजनेसाठी अनेकदा केलेले अर्ज निकषात बसत नाही, ही सबब करून नामंजूर करण्यात आले. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून व्यथा मांडली. तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी वृत्ताची दखल घेत विशेष बाब म्हणून सदर वयोवृद्ध दाम्पत्याला श्रावणबाळ योजनेचे अनुदान सुरू केले.
बलदेव अमरगिर मेधानी (७५) व सुगंधा बलदेव मेधानी (७०) हे हेटी येथे चंद्रमोळी झोपडीत राहतात. घरची स्थिती हलाखीची असल्याने भिक्षा मागून पोट भरत होते. हलाखीची स्थिती असली तरी त्यांचे दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव नव्हते. लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असावा, हा निराधार योजनेचा महत्त्वाचा निकष आहे. यामुळे अनेकदा अर्ज करूनही ते नामंजूर होत होते. त्यांनी कैफीयत मांडल्यानंतर ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. तहसीलदार डॉ. होळी यांनी तलाठी एस.झेड. मरसकोल्हे यांना सदर दाम्पत्याचे निराधाराचे प्रकरण तयार करून सादर करण्याचे निर्देश दिले. अखेर श्रावणबाळ योजनेत सदर दाम्पत्याची निवड केली व तत्सम लेखी पत्रही दिले. योजनेत निवड झाल्याचे पत्र पाहताच त्या वयोवृद्ध दाम्पत्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. तुटपुंजी का होईना, मिळणारी मदत ही त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरली.(वार्ताहर)