‘ते’ चक्क नावेतून करतात दुधाची ने-आण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 10:14 PM2019-06-22T22:14:43+5:302019-06-22T22:15:20+5:30
तालुक्यातील निम्न वर्धा धरणात बॅकवॉटरमुळे तयार झालेल्या बेटावर चार युवकांनी १२० म्हशी पाण्यातून पोहत नेल्या, दररोज पहाटे धरणाच्या पाण्यातून जाणे-येणे करण्यासाठी त्यांनी नाव विकत घेतली. त्या स्थळी ते नावेने जातात, दूध काढतात आणि दूध घेऊन परत येतात. परिसरात सकस दुधाचे वाटप करतात.
सुरेंद्र डाफ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तालुक्यातील निम्न वर्धा धरणात बॅकवॉटरमुळे तयार झालेल्या बेटावर चार युवकांनी १२० म्हशी पाण्यातून पोहत नेल्या, दररोज पहाटे धरणाच्या पाण्यातून जाणे-येणे करण्यासाठी त्यांनी नाव विकत घेतली. त्या स्थळी ते नावेने जातात, दूध काढतात आणि दूध घेऊन परत येतात. परिसरात सकस दुधाचे वाटप करतात.
प्रयत्न केल्यावर कोणतीही बाब सहज साध्य होते, हे या चार युवकांनी आपल्या कष्टाने सार्थ करून सर्वांना दाखविले. संदीप आंबुडारे, गुड्डू वाळके, सचिन आंबुडारे, भारत मानकर हे या चौघा युवकांची नावे असून ते आर्वी तालुक्यातील बोरगाव हातला येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. म्हशी आहे; पण चाराच नाही. तालुक्यात वैरणाची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने गुराढोरांचे काय? असा प्रश्न गोपालक व शेतकऱ्यांनी उपस्थित केला. या चौघा युवकांनी एकत्र येत निम्न वर्धा धरणात निर्माण झालेल्या बेटावर १२० म्हशी नेऊन त्यांची नैसर्गिकरीत्या सकस आहाराची सोय केली. आर्वी तालुक्यात निम्न वर्धा धरण आहे. २४ गावे या धरणाने उजाड केली. अडीच हजार हेक्टरमध्ये हे धरण असून पुरेसा पाणीसाठा आहे; मात्र काही ठिकाणी चढ-उतार असल्याने पाणी आटले आणि तेथे हिरवीगार चाºयाची बेटे निर्माण झाली. पंचेवीस-पंचेवीस एकराचे हे दोन बेट असून आजूबाजूला पाणी आहे. नांदुरा काळे गावापासून सात किलोमीटर अंतरावर हे बेट आहे. टंचाईवेळी संदीप आंबुडारे, गुड्डू वाळके, सचिन आंबुडारे, भारत मानकर हे युवक चाºयाच्या शोधात असताना त्यांना हे बेट गवसले. त्यांनी या जागी म्हशी नेण्याचे नियोजन केले. नावेला बांधून काही म्हशी तेथे नेल्या. उर्वरित म्हशी पाण्यात सोडून त्यांच्यामागे पोहत-पोहत त्या म्हशी हाकलत त्या बेटावर नेल्या. सध्या तेथे १२० म्हशी आहेत. मुबलक प्रमाणात म्हशींना नैसर्गिक चारा उपलब्ध झाला. पाण्याचा ही प्रश्न मिटला आहे. निवास, राखणदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.