‘ते’ पिंपळाचे झाड चौकशीच्या भोवऱ्यात
By admin | Published: May 25, 2015 02:12 AM2015-05-25T02:12:20+5:302015-05-25T02:12:20+5:30
शासकीय कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीत लिलाव घेत तोडलेले पिंपळाचे झाड चौकशीच्या भोवऱ्यात आले आहे.
घोराड : शासकीय कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीत लिलाव घेत तोडलेले पिंपळाचे झाड चौकशीच्या भोवऱ्यात आले आहे. या प्रकरणात लिलावाच्या पहिलेच झाडाची तोडलेली लाकडे परत नेण्याचे पत्र आल्याने अनेक चर्चेला उधान आले आहे. नजीकच्या वाहितपूर येथील पिंपळाचे झाड अनेकांच्या अंगलट येणार आहे. याप्रकरणी योग्य चौकशी केली जात नसल्याचा आरोप होत आहे.
वाहितपूर येथील कोंडवाड्याच्या जागेवर असलेले पिंपळाचे झाड तोडून ग्रामपंचायतकडून यात अफरातफर झाल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे एका ग्रामपंचायत सदस्याने केली. यावर विस्तार अधिकाऱ्याने दिलेला अहवाल हा एकतर्फी असून प्रमुख मुद्दावर चौकशीच झाली नसल्याने पुन्हा चौकशीची मागणी केली. ही चौकशी नावापुरतीच झाल्याची शंका व्यक्त होत आहे.
झाडाचा लिलाव १० डिसेंबरला करण्यात आला. असे असताना त्यापूर्वीच ३ डिसेंबरला झाडाची वाहतूक करण्याचा परवाना तयार करण्यात आला. यात वाहनाचा क्रमांक, चालकाचे नाव, झाडे कोणत्या मार्गाने नेणार आहे याची माहिती नमूद आहे. यामुळे झाडाची अवैध कत्तल करण्यात आल्याची चर्चा जोर धरत आहे. लिलावाच्या दिवशी शासनाचा प्रतिनिधी असलेले ग्रामसचिव हजर नव्हते, असा आरोप ग्रा.पं. सदस्यांनी केला आहे. मुख्य मुद्याला चौकशी अधिकारी बगल देत असल्याचा आरोप करीत ग्रा.पं. सदस्य लुकेश लोटे यांनी उपकार्यपालन अधिकाऱ्यांकडे केला आहे. लिलावाच्या दिवशी असलेली ग्रामसभा तहकुब झाली होती. ग्रामसभेला सचिव हजर होते; परंतु प्रकृती ठिक नसल्याने ते लिलावाला गैरहजर असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. सरपंच व लिलाव घेणाऱ्याचे बयाण ग्रामपंचायत रेकॉर्डनुसार जुळत आहे. त्यामुळे हा लिलाव योग्य असल्याचा अहवाल गटविकास अधिकारी यांनी दिला आहे. बयाण जुळत असले तरी तक्रारकर्त्यांचे मुद्दे वेगळेच राहिले असून यात हयगय झाल्याची चर्चा होत आहे. (वार्ताहर)