'त्यांनी' इन्स्टाग्रामवर अपलोड केला कार रेसिंगचा व्हिडिओ आणि काही क्षणातच काळाने घातली झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 05:03 PM2022-01-31T17:03:17+5:302022-01-31T17:06:21+5:30

Wardha News वर्धा जिल्ह्यातील सात भावी डॉक्टरांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांनी इन्स्टावर अखेरचा अपलोड केलेला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत त्यांनी कारची रेस लावल्याचे दिसत असून, हळू गाडी चालवा असाही इशारा देताना दिसत आहे.

'They' uploaded a video of the car racing on Instagram and in a few moments the time came | 'त्यांनी' इन्स्टाग्रामवर अपलोड केला कार रेसिंगचा व्हिडिओ आणि काही क्षणातच काळाने घातली झडप

'त्यांनी' इन्स्टाग्रामवर अपलोड केला कार रेसिंगचा व्हिडिओ आणि काही क्षणातच काळाने घातली झडप

Next
ठळक मुद्दे कार ‘रेसिंग’चा नाद ठरला ‘त्या’ सात भावी डॉक्टरांचा काळअपघातापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल


वर्धा : देवळीनजीकच्या सेलसुरा येथे २५ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वैद्यकीय महाविद्यालयातील सात भावी डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तब्बल सात दिवसांनंतर या विद्यार्थ्यांचा अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला असून एका काळ्या रंगाच्या कारसोबत ‘रेस’ त्यांनी लावली होती, असे पुढे आले आहे. त्यामुळेे हा नादच त्या सातही भावी डॉक्टरांचा काळ ठरला हे आता निश्चित झाले आहे.

सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सात जिवलग मित्र इसापूरजवळील मॉ की रसोई या ढाब्यावर पवन शक्ती याचा वाढदिवस साजरा करुन परतत असताना एका कारसोबत लावलेल्या रेसिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात व्हिडिओ शूट करताना ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या सीटवर बसून हा व्हिडिओ शूट केल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओत गाडीचा वेग अतिशय असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यातूनच पुढे वेगावर नियंत्रण न मिळाल्याने कार सरळ पुलाच्या १२ इंच सिमेंट भिंतीवर आदळून थेट ४० फूट नदीत कोसळल्याने सातही भावी डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे आता निश्चित झाले आहे.

एकाने म्हटले सर... जरा आरामसे चलाव...

एका काळ्या रंगाच्या महागड्या कारशी रेस लावताना मृतक सातही डॉक्टर बसलेल्या गाडीचा वेगही १५० च्यावर होता. दरम्यान, कारमधील मृत एका तरुणाने सर गाडी जरा आरामसे चलाव...असा शब्दप्रयोग केल्याने कारचा वेग हा जास्त असल्याची चर्चा आहे.

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे

तिरोडा येथील आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले, नीरज चौव्हाण, नीतेश सिंग, विवेक नंदन, प्रत्यूश सिंग, शुभम जयस्वाल, पवन शक्ती हे नीतेश सिंग याच्या वाहनाने पवन शक्तीचा वाढदिवस साजरा करायला गेले होते.

इन्स्टाग्राम अकाऊंटवर मिळाला व्हिडिओ

वाढदिवस साजरा करून परत येताना अपघातात मृत पावलेल्या शुभम जयस्वाल याने कारसोबत लावलेल्या रेसिंगचा व्हिडिओ शूट करून अपघाताच्या काहीवेळापूर्वीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला होता. तेथूनच हा व्हिडिओ पुढे व्हायरल झाल्याची माहिती आहे.

आठजणांचे नोंदविले जबाब

सात भावी डॉक्टरांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सावंगी पोलिसांनी वैद्यकीय महाविद्यालयातील काही मित्रांचे तसेच हॉस्टेलच्या वॉर्डनचे असे एकूण सात ते आठजणांचे जबाब नोंदविले असल्याची माहिती सावंगी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मल्हारी ताळीकोटे यांनी सांगितली.

गाण्यांचा आवाज होता फुल्ल

इसापूरनजीकच्या ढाब्यावरून जेवण करून परत येत असताना मृतक तरुण चालवित असलेल्या कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे सुरू असल्याचे व्हिडिओतून दिसून आले. सातही तरुण जोरजोराने आरडाओरड करून सेलिब्रेशन करीत असल्याचेही दिसून येत होते.

 

 

Web Title: 'They' uploaded a video of the car racing on Instagram and in a few moments the time came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.