दारू पकडायला गेले अन्् मदत करून आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 05:00 AM2020-05-10T05:00:00+5:302020-05-10T05:00:10+5:30
खायला धान्य नाही, पिण्यासाठी पाणी नाही, रात्रीला वीज नाही अशा परिस्थितीतही फासे पारधी समाजाच्या २० कुटूंबातील १२५ व्यक्ती कवाडी तांड्यावर राहतात. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत राहणाऱ्या या लोकांची लॉकडाऊनमुळे मोठी कुचंबना झाली. मागील ५० दिवसांपासून या लोकांच्या हाताला काम राहिलेल नाही. महिन्याला रेशन दुकानातून मिळणारे धान्य या शिवाय दुसरी कुठलीही मदत त्यांना मिळत नाही.
पुरूषोत्तम नागपुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : नजीकच्या कवाडीतांडा परिसरात लॉकडाऊनच्या काळात दारूसाठा असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. त्या आधारावर पोलीस कारवाई करण्यासाठी गेले. परंतू या पारधी तांड्यावरील २० कुटुंबातील १२५ लोकांची व्यथा पाहून पोलीस प्रशासनही पाणावले व या कुटूंबाला तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांच्या पुढाकाराने साहित्य पोहचविण्याचे काम करण्यात आले. तांड्यावरचा हा अनुभव प्रशासनालाही धक्का देणारा ठरला.
खायला धान्य नाही, पिण्यासाठी पाणी नाही, रात्रीला वीज नाही अशा परिस्थितीतही फासे पारधी समाजाच्या २० कुटूंबातील १२५ व्यक्ती कवाडी तांड्यावर राहतात. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत राहणाऱ्या या लोकांची लॉकडाऊनमुळे मोठी कुचंबना झाली. मागील ५० दिवसांपासून या लोकांच्या हाताला काम राहिलेल नाही. महिन्याला रेशन दुकानातून मिळणारे धान्य या शिवाय दुसरी कुठलीही मदत त्यांना मिळत नाही. दारू पकडण्यासाठी गेलेले पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले यांच्या समोर फासे पारधी बांधवानी आपल्या समस्येची जंतरीच मांडली. लहान मुलांना सोबत घेवून अंधारात त्यांना दिवस काढावे लागतात. या भागात पिण्याच्या पाण्यासाठी हॅन्डपंप देण्यात आला आहे; पण तो नादुरूस्त असल्याने दुरून पाणी आणावे लागते. या सर्व बाबीची माहिती पोलीस उपनिरीक्षकांनी तहसीलदार चव्हाण यांना दिली. चव्हाण यांनी लगेच जीवनावश्यक साहित्याच्या २० किट या कुटूंबासाठी पाठविल्या. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून येथे विद्युत पुरवठा सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आली. तसेच हॅन्डपंप नादुरूस्त असल्याने तो दुरूस्त करण्याबाबत पं.स. प्रशासनाला कळविण्यात आले. या कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वितरीत करताना नायब तहसीलदार विनायक मगर, पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, विजय वरकड, आकाश अजमिरे, पठाण डेहणकर, कैलास अजमिरे उपस्थित होते.