रायपूरमधून हिऱ्याच्या अंगठ्या पळविणाऱ्यास वर्धेत अटक; ४७.८२ लाखांचे दागिने हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 11:12 AM2022-02-14T11:12:23+5:302022-02-14T11:17:59+5:30

त्याच्याकडून सुमारे ४७ लाख ८२ हजारांचे दागिने हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी पत्रपरिषदेतून दिली.

thief who stole worth 47 lakhs of diamond ring from raipur arrested in wardha | रायपूरमधून हिऱ्याच्या अंगठ्या पळविणाऱ्यास वर्धेत अटक; ४७.८२ लाखांचे दागिने हस्तगत

रायपूरमधून हिऱ्याच्या अंगठ्या पळविणाऱ्यास वर्धेत अटक; ४७.८२ लाखांचे दागिने हस्तगत

googlenewsNext
ठळक मुद्देवर्धा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

वर्धा : रायपूर येथील पारेख डाया ज्वेलर्स यांच्या मालकीचे तब्बल ४७ लाख ८२ हजार रुपये किमतीच्या हिऱ्यांच्या अंगठ्या वर्ध्यातील एका चोरट्याने लंपास केल्या होत्या. याची तक्रार शहर पोलिसात अमित रमेशकुमार पारेख यांनी दाखल केली होती. शहर पोलिसांनी कसोशीने तपास करीत अवघ्या काही तासांत चोरट्यासअटक केली. त्याच्याकडून सुमारे ४७ लाख ८२ हजारांचे दागिने हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी पत्रपरिषदेतून दिली.

पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव महेश ऊर्फ सुदाम पांडुरंग गाठेकर (रा. पोद्दार बगीचा स्विपर कॉलनी) असे असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. रायपूर येथील पारेख डाया ज्वेलर्स येथून १४ आणि १८ कॅरेटच्या सोन्यात डायमंड मढविलेले असलेल्या ७१ अंगठ्या आणि ८२ टॉप्स असे एकूण ४७ लाख ८२ हजार ३१९ रुपयांचे दागिने बैतुल मध्य प्रदेश येथे वितरित करण्यासाठी प्लास्टिक चौकोनी डब्यात त्याच्या दुकानात काम करणारा पुरुषोत्तम यादव याच्या ताब्यात देऊन रायपूर येथून बैतुल येथे जाण्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी रायपूर रेल्वेस्थानकावर सोडून दिले होते.

१० फेब्रुवारी रोजी दुकानातील नोकर पुरुषोत्तम यादव याला सराफा व्यावसायिकाने कॉल केला असता त्याने मी वर्ध्याला आलो आहे, कसा आलो हे माहिती नाही, असे सांगितले. त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी पुरुषोत्तम यादव याला पुन्हा फोन करून विचारणा केली असता त्याने दागिने असलेला बॉक्स कुणीतरी चोरुन नेल्याचे समजले. त्यानुसार सराफा व्यावसायिक अमित पारेख यांनी वर्धा गाठून याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्याकडे दिली. याचा तपास शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोधपथकाने कसोशीने केला असता पोलिसांनी आरोपी सुदाम गाठेकर यास अवघ्या काही तासांतच अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, सचिन इंगोले, संजय पंचभाई, सुभाष घावड, अनुप राऊत, किशोर साठोणे, दीपक जंगले, सुनील मेंढे, राजेश ढगे, श्याम सलामे, आकाश बांगडे, पवन निलेकर, राहुल भोयर यांनी केली.

आरोपीस शोधताना आल्या अडचणी

नोकर पुरुषोत्तम यादव हा वर्ध्यात आला असता त्याने मद्यपान केले होते. दारूच्या नशेत त्याला आरोपी महेश गाठेकर हा भेटला. रेल्वेस्थानक परिसरात दोघांनीही मद्यपान केले आणि दागिने असलेला बॉक्स चोरून नेला. याचा शोध घेण्यात पोलिसांना मोठ्या अडचणी आल्या. कारण त्याच्याजवळ साधा मोबाईल होता. मात्र, त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी तांत्रिक तपास करून गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या.

Web Title: thief who stole worth 47 lakhs of diamond ring from raipur arrested in wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.