चोरट्यांनी एकाच दिवशी फोडली तब्बल सात दुकाने; शहरात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 09:30 PM2023-04-05T21:30:07+5:302023-04-05T21:30:38+5:30
Wardha News शहरातील मार्केट परिसरातील बहुतांश दुकाने चोरट्यांनी एकाच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास फोडल्याने नागरिकांत मोठी खळबळ उडाली आहे.
वर्धा : शहरातील मार्केट परिसरातील बहुतांश दुकाने चोरट्यांनी एकाच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास फोडल्याने नागरिकांत मोठी खळबळ उडाली आहे. यात तीन दुकानातील जवळपास पाच हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली असून चार दुकानांचे केवळ शटर फोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहरातील वडगांव रस्त्यावर असलेल्या श्रीकांत शेषराव दंढारे यांच्या मालकीच्या किराणा दुकानातून चोरट्यांनी चिल्लरसह नोटा मिळून जवळपास तीन हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. को-आपरेटिव्ह बँकेच्या समोरील सोमनाथे यांच्या मालकीच्या ऋषिकेश हार्डवेअर मधून सातशे रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली. रवींद्र सोमनाथे यांच्या हार्डवेअरच्या दुकानाचे शटर तोडून काऊंटरमधली एक हजार रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली. यशवंत चौकातील दिपक तडस यांच्या मालकीच्या भगवती ऍग्रो एजन्सी, आरामशीन चौकातील सय्यद कॉम्प्लेक्स परिसरातील पाटील यांच्या प्रितम ट्रेडर्स, बसस्थानक परिसरातील भटेरो यांच्या श्रीराम हार्डवेअर तसेच दंढारे यांच्या अशोका हॉटेलमध्ये सुद्धा चोरट्यांनी शटर व कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला, परंतु सुदैवाने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणातील दोन चोरटे हे तोंडाला फडके गुंडाळून चोरीच्या प्रयत्नात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत ठसेतज्ञ तसेच श्वान पथकाला पाचारण करीत शोधमोहीम सुरू केली आहे. परंतु शहरात एकाच दिवशी अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात दुकानफोडीच्या घटना घडल्याने नागरिकांत मात्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिनाभराआधी देखील चौधरी कॉम्प्लेक्स शेजारच्या अहमदभाई यांच्या इलेक्ट्रिकल्सच्या दुकानातून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज तांब्याचे मोटर वेडिंग तार लंपास केला होता. ते देखील चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनीही भेट दिली होती, परंतु अद्यापही "त्या" चोरीच्या घटनेतील चोरट्यांचा पोलिसांना थांगपत्ता लागला नाही हे विशेष..