पावणेदोन लाखांच्या संत्र्यावर चोरट्याने केला हात साफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 05:00 AM2022-03-14T05:00:00+5:302022-03-14T05:00:26+5:30
खरसखांडा येथील माजी सरपंच विकास नासरे यांनी त्यांच्या शेतातील संत्रा पिकाची तोडणी करून शेतातच संत्र्याचा ढीग करून ठेवला. मध्यरात्रीच्या सुमारास पाच अज्ञात व्यक्तींनी नासरे यांच्या शेतात येत संत्र्याच्या ढिगाशेजारी झोपून असलेल्या मजुरांना धमकाविले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांपैकी एकाने मालवाहू वाहनाला पाचारण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घाडगे) : तालुक्यातील अनेक शेतकरी संत्रा पिकाचे उत्पादन घेतात. अशाच एका संत्रा उत्पादकाचा तोडणी केलेला पावणेदोन लाखांचा संत्रा चोरट्याने काळोखाचा फायदा घेत मालवाहूच्या साहाय्याने चोरून नेला. ही घटना मध्यरात्री तालुक्यातील खरसखांडा शिवारात घडली असून रविवारी सकाळी उघडकीस आली.
खरसखांडा येथील माजी सरपंच विकास नासरे यांनी त्यांच्या शेतातील संत्रा पिकाची तोडणी करून शेतातच संत्र्याचा ढीग करून ठेवला. मध्यरात्रीच्या सुमारास पाच अज्ञात व्यक्तींनी नासरे यांच्या शेतात येत संत्र्याच्या ढिगाशेजारी झोपून असलेल्या मजुरांना धमकाविले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांपैकी एकाने मालवाहू वाहनाला पाचारण केले.
हिंदी आणि मराठी भाषेचा वापर करून संवाद साधणाऱ्या चोरट्यांनी ढीग करून असलेल्या सुमारे पाच टन संत्र्यापैकी तीन टन संत्रा मालवाहूत लादून चोरून नेला. चोरट्यांनी घटनास्थळावरून यशस्वी पळ काढल्यावर घाबरलेल्या मजुरांनी स्वत:ला सावरत नासरे यांचे घर गाठून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर नासरे यांनी संत्राचोरीची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी तक्रारीवरून कारंजा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून पुढील तपास कारंजाचे ठाणेदार दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात प्रफुल्ल माहूर करीत आहेत.
परिसरात चोरट्यांची दहशत
- खरसखांडा येथे चक्क माजी सरपंचाच्या शेतातून संत्रा पळविण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील चोरट्यांचा कारंजा पोलीस शोध घेत असले तरी या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये चोरट्यांबाबत कमालीची दहशत पसरली आहे.