चोरट्यांची नजर आता औषध दुकानांवर; वर्ध्यात दोन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 03:16 PM2021-05-27T15:16:14+5:302021-05-27T15:16:49+5:30

Wardha news जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, एकाच रात्री दोन औषधी दुकाने आणि कृषी केंद्रात चोरी करून रोख लंपास केल्याने संचारबंदीतही चोरटे सुसाट झाल्याचे दिसून येत आहे.

Thieves now look to drug stores; Two shops were blown up in Wardha | चोरट्यांची नजर आता औषध दुकानांवर; वर्ध्यात दोन दुकाने फोडली

चोरट्यांची नजर आता औषध दुकानांवर; वर्ध्यात दोन दुकाने फोडली

Next
ठळक मुद्देकडक संचारबंदीत चोरटे सुसाट

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, एकाच रात्री दोन औषधी दुकाने आणि कृषी केंद्रात चोरी करून रोख लंपास केल्याने संचारबंदीतही चोरटे सुसाट झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेने शहरातील व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वंजारी चौक स्थित बॅचलर रोडवर अतुल दादाराव भरणे यांचे औषध दुकान आहे. रात्रीच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त दिसून आले. तसेच गल्ल्यातील पाच हजार रुपये दिसून आले नाहीत. इतकेच नव्हेतर, दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड करून त्यातील ८ हजार किमतीची हार्डडीस्क चोरून नेली.

दुसरी चाेरीची घटना मालगुजारीपुरा परिसरात घडली. मालगुजारीपुरा परिसरात आशिष घनश्याम मनोजा (रा. दयालनगर) यांचे औषधी दुकान आहे. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करीत गल्ल्यातील सहा हजार रुपये चोरून नेले.

तिसरी चोरीची घटना सिंदी लाइन मोहता मार्केट परिसरात घडली. श्यामसुंदर किसनलाल चांडक आणि भागीरथ चांडक यांच्या मालकीच्या कृषी केंद्रात चोरट्याने चोरी केली. श्यामसुंदर यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील १४०० रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रं तसेच भागीरथ चांडक यांच्या दुकानात चोरी करीत गल्ल्यातून २५०० रुपये चोरून नेले. या तिन्ही घटनांची तक्रार शहर आणि रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात सर्व दुकाने बंद असतानाही चोरटे मात्र सुसाट झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अवघ्या काही अंतरावर पोलीस ठाणे तरीही...

शहरातील मोहता मार्केट परिसर आणि वंजारी चौकाच्या अवघ्या काही अंतरावर पोलीस ठाणे आहेत. मात्र, चोरट्यांनी याच परिसरात चोरी करून पोलिसांनाच आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ या चोरट्यांना जेरबंद करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सीसीटीव्हीचे डोळेही मिटलेलेच

शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारा शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवले जात होते. मात्र, तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांच्या कार्यकाळात कंट्राेल रूममधील युनिटला आग लागल्याने शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. त्यामुळे तत्काळ शहरातील सीसीटीव्ही कॅमेरांचे डोळे सुरू करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

पोलिसांची गस्त वाढवावी

शहरात संचारबंदी असतानाही होणाऱ्या चोऱ्या ही चिंतेची बाब बनली आहे. या घटनांमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी दिवसापेक्षा रात्रीची गस्त वाढवावी, जेणेकरून चोरट्यांना अटकाव होईल, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Thieves now look to drug stores; Two shops were blown up in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Robberyचोरी