प्रबोधनातून गांधी विचार युवकांपर्यंत पोहोचले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:23 PM2017-09-04T23:23:40+5:302017-09-04T23:23:58+5:30
ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, अस्पृश्यता निवारणाचे काम महात्मा गांधींनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, अस्पृश्यता निवारणाचे काम महात्मा गांधींनी केले. भारत खेड्यांचा देश असल्याने अधिक संपन्नतेकरिता हाताला काम देत व्यसनमुक्तीचे काम प्रकर्षाने झाले पाहिजे. आपला देश तरुणांचा असल्याने युवकांपर्यंत महत्मा गांधी यांचे विचार पोहचविणे आवश्यक असल्याचे मत प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी मांडले.
यात्री निवासच्या सभागृहामध्ये महाराष्ट्र अंनिस व सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या गांधी १५० अंतर्गत राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप रविवारी झाला. प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश पाटील, प्रा.डॉ. श्रीराम जाधव, प्रा. शेखर सोनाळकर, सुनील स्वामी, गजेंद्र सुरकार, माधव बावगे, अरूण चवडे आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे सुतगुंडीने स्वागत करण्यात आले.
मनोगतातून प्रा. सविता शेट्ये यांनी नकारात्मक विचार करणाºया युवकापर्यंत गांधी पोहचवावा, सुनील स्वामी यांनी चळवळीत युवकांनी यावे यासाठी कार्यक्रम राबवावे. माधव बावगे म्हणाले, प्रश्नोत्तरातून गांधी मांडावा, सायकल यात्रा काढावी तर अविनाश पाटील यांनी युवकांमध्ये ऊर्जा निर्माणासाठी कार्यक्रम दिले पाहिजे, असे विचार मांडले.
प्रास्ताविक गजेंद्र सुरकार यांनी केले. संचालन प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार प्रा. अजय सावरकर यांनी मानले. ‘हम होंगे कामयाब’ या गीताने सांगता झाली. अविनाश पाटील, स्रेहलता पाटील व अनन्या पाटील यांचा शाल व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. सेवाग्रामच्या दारूबंदी मंडळाच्या मंदा कापसे, रजनी कान्हेरे व पंचफुला सहारे यांचा सन्मान करण्यात आला.
या शिबिरात महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील ८७ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. प्रा.डॉ. सुधाकर सोनवणे, प्रा. शेखर सोनाळकर, डॉ. सोहम पंड्या, प्रा.डॉ. श्रीराम जाधव, डॉ. उल्हास जाजू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चळवळीची गीते व चित्रपट दाखविण्यात आला.