तिसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव
By admin | Published: June 8, 2017 02:28 AM2017-06-08T02:28:44+5:302017-06-08T02:28:44+5:30
नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी शहरातील अतिक्रमणावर गजराज चालला.
नगरपालिकेची कारवाई : किरकोळ विक्रेत्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी शहरातील अतिक्रमणावर गजराज चालला. शिवाजी चौक ते देऊरवाडा मार्ग, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, बालाजी टॉकीज रोड ते देऊरवाडा मार्गावरील दुकाने, पानटपरी, चहाटपरी व शेड जेसीबीने काढण्यात आले.
या मार्गावरील अतिक्रमण काढणार असल्याची माहिती देण्यात आली होती. सदर अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात येत आहे. या मोहिमेमुळे छोट्या व्यावसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने त्यांच्या उपजिविकेचे साधन हिरावले गेल्याची प्रतिक्रीया किरकोळ विक्रेते व्यक्त करीत होते. या विक्रेत्यांना शहरात पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. अतिक्रमण काढताना दुकानदारांची वादावादी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी जागा व मोकळ्या केलेल्या जागेवर अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता पालिका प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. पालिका प्रशासन काय दक्षता घेते याकडे आर्वीकरांचे लक्ष लागले आहे.
अल्लीपूर ग्रामपंचायतने काढले अतिक्रमण
अल्लीपूर - आठवडी बाजार येथे मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण करून जागा बळकावल्याने एन.के.व्ही. कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांना याचा त्रास होत असल्याची तक्रार ग्रामपंचायतला देण्यात आली. अतिक्रमणधारकांना नोटीस देऊनही अतिक्रमण काढले नाही, म्हणून ग्रा.पं. प्रशासनाने येथील काढले. सरपंच मंदा पारसडे, उपसरपंच विजय कुबडे, ग्रामसचिव गव्हाळे व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.