राज्य शिक्षणात तिसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 10:20 PM2019-01-03T22:20:46+5:302019-01-03T22:21:24+5:30

कोणतंही मूल नापास होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोईसाठी त्याच्या कपाळावर अनुत्तीर्णचा शिक्का लागतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण, असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहे.

Third in state education | राज्य शिक्षणात तिसऱ्या क्रमांकावर

राज्य शिक्षणात तिसऱ्या क्रमांकावर

Next
ठळक मुद्देविनोद तावडे : ‘शिक्षणाची वारी’चे उद्घाटन, १०० आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोणतंही मूल नापास होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोईसाठी त्याच्या कपाळावर अनुत्तीर्णचा शिक्का लागतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण, असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहे. त्याचा परिणाम म्हणजे ४ वर्षांत राज्य शिक्षणाच्या बाबतीत देशात १६ व्या क्रमांकावरून ३ क्रमांकावर आले आहे आणि यावर्षी ते प्रथम क्रमांकावर राहील. विद्यार्थी घडविणे हा मूळ उद्देश असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
वर्धा येथील चरखाघर येथे आयोजित शिक्षणाची वारी&या उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, विभागीय आयुक्त संजीव कुमार , शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, सभापती सोनाली कलोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, पंचायत समिती सभापती महानंदा ताकसांडे, शिक्षण विभागाचे संचालक सुनील मगर, माजी खासदार सुरेश वाघमारे, जि.प. सदस्य नूतन राऊत, प्राचार्य डॉ. किरण धांडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिवलिंंग पटवे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सिद्धार्थ मेश्राम आदी उपस्थित होते. राज्यात शिक्षण क्षेत्रात विविध गुणात्मक बदल झाल्यामुळे अनेक शिक्षकांनी त्याचे स्वागत करून ते राबविल्यामुळे आज शिक्षणात गुणात्मक बदल दिसतोय. वर्धेत १ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषद शाळेत आणण्याचे काम जिल्हा परिषद शिक्षकांनी केले आहे. हा त्या जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली आहे याचा परिणाम असून याचे श्रेय शिक्षकांना जातेय, असे तावडे म्हणाले. इंग्रजीतून शिक्षणाला विरोध नाही, हे स्पष्ट करताना ते म्हणाले, मराठी भाषा ही डोळे असून, इंग्रजी भाषा ही चष्मा आहे. त्यामुळे दृष्टी असल्याशिवाय दूरदृष्टी येणार नाही. म्हणून मातृभाषेतून शिक्षणाला नेहमीच पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना शाबासकी देण्यासाठी आणि त्यांचे प्रयोग राज्यभर पोहोचून इतर शाळांनी तसेच उपक्रम राबवून राज्याला शैक्षणिकदृष्ट्या प्रगत करावे, यासाठी शिक्षणाची वारी हा उपक्रम सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात ६४ हजार शाळा शिक्षक आणि लोकप्रतिनिधींच्या लोकवर्गणीतून डिजिटल झाल्या आहेत. आता केंद्र शासन देशातील १५ लाख शाळांमध्ये डिजिटल बोर्ड हा उपक्रम सुरू करणार आहे. राज्य शासन नापास विद्यार्थ्यांसाठी वन टू वन करिअर समुपदेशन करून त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देत आहे. घोकंपट्टी परीक्षा पद्धतीमुळे महाराष्ट्र संशोधक तयार करण्यात कमी पडला आहे. त्यामुळे मागील ४ वर्षांपासून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलला आहे. तसेच यापुढे विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणात शिक्षकाची उपलब्धता होणार असल्यामुळे शिक्षकांना विविध उपक्रम राबविण्यासाठी वेळ मिळेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विनोंद तावडे यांनी शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या शिक्षणविषयक प्रश्नांना उत्तरे दिलीत.
यावेळी श्री विद्यामंदिर कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी काव्या शशिकांत इरूटकर हिने दफ्तराच्या ओझ्याबाबत प्रश्न उपस्थित केला, तेव्हा तावडे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना यावर नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले. मुलाच्या वजनाच्या १० टक्केच बॅगचे वजन असले पाहिजे, असे शासन निर्देश आहे, असे सांगितले. १० जिल्हे या वारीला जोडले असून ६ जानेवारी पर्यंत चालणा?्या वारीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सुनील मगर यांनी प्रस्ताविकातून केले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले तर आभार शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांनी मानले.
बालरक्षक चळवळ
राज्यात बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून कोणतेही मूल शाळाबाह्य राहू नये यासाठी काम करीत आहे. या माध्यमातून गोंदिया जिल्हा हा शाळाबाह्य विद्यार्थीमुक्त जिल्हा झाला आहे, असे विनोद तावडे यांनी सांगितले. यावेळी आमदार पंकज भोयर आणि आमदार समीर कुणावर यांनीही शिक्षणाच्या वारीला शुभेच्छा दिल्यात. यावेळी अनटोल्ड स्टोरी या दिव्यांगानी त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या यशोगाथेच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दीप्ती बेले या कान्हापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीचा दीपकाव्य कवितासंग्रह, शुभांगी वासनिक यांच्या रत्नाची खाण आणि सार्थक जीवनासाठी संस्कार पर्व या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शिक्षणाची वारीमध्ये विविध शाळांच्या वतीने 55 दालने लावण्यात आली आहेत .
ओपन बोर्डची स्थापना करणार
काहीं विद्यार्थी संगीत, अभिनय, गायन ,खेळ यामध्ये रस असतो. पण, शाळेमुळे त्यांना त्यांच्या या सुप्त गुणांवर लक्ष देता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांचे त्या-त्या क्षेत्रात उत्तम करिअर घडावे यासाठी आणि शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी असे ओपन बोर्ड यापुढे त्याला मदत करेल.
शास्त्रज्ञांनी तयार केला अभ्यासक्रम
च्महाराष्ट्र आंतराष्ट्रीय शैक्षणिक बोर्डाची स्थापना करून राज्य शासनाने यावर्षी १३ शाळा सुरू केल्यात. पुढील वर्षात १०० शाळा सुरू करणार असल्याचे शिक्षण मंती विनोद तावडे यांनी सांगितले. याचा अभ्यासक्रम डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. काकोडकर, विजय भटकर, सोनम वांगचोक यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी तयार केला आहे, असेही त्यानी यावेळी सांगितले.

Web Title: Third in state education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.