शहरातून निघालेल्या दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीला यंदा लागले गालबोट !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 05:44 PM2024-10-14T17:44:45+5:302024-10-14T17:48:32+5:30
विविध ठिकाणी मारहाणीच्या घटना : पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर, शांतता कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील दुर्गादेवी विसर्जन सर्वत्र प्रसिद्ध आहे. ११ रोजी शुक्रवारी शहरातील ३३ दुर्गामातांचे ढोल पथकांच्या गजरात विसर्जन करण्यात आले. मात्र, विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी पोलिसांकडून सौम्य बळ वापरण्यात आल्याने काही मंडळातील सदस्यांमध्ये नाराजी पसरली, तर काही ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या, वर्ध्यात मागील तीन वर्षांत पहिल्यांदाच दुर्गादवी विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची चर्चा १२ रोजी दिवसभर शहरातील नागरिकांकडून सुरू होती.
दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात मोठ्या संख्येने नागरिकांची मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी उसळते. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बजाज चौकापर्यंतचा मार्ग वाहतुकीस बंद असतो. या मार्गाच्या दोन्ही बाजूने भरगच्च गर्दी असते. अशातच विविध देवी मंडळांकडून आकर्षक रोषणाई आणि ढोल ताशा पथकांसह संदलच्या आवाजात ही मातेला अखेरचा निरोप देत विसर्जन मिरवणूक काढल्या जाते. डिजे आणि मिरवणूक काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने १२ वाजेपर्यंतची वेळ दिली होती. अशातच ठिकठिकाणच्या चौकात आयोजित प्रसाद वाटप आणि इतर कार्यक्रमांमुळेही मोठी गर्दी होती. जसजशी गर्दी वाढत चालली होती, तसतशी पोलिसांकडूनही देवी मंडळातील सदस्यांना सूचना दिल्या जात होत्या.
काही पोलिस कर्मचाऱ्यांनी एका मंडळातील सदस्यांवर सौम्य बळाचा वापर करून देवी पुढे नेण्यासाठी आग्रह धरला आणि मग चांगलाच गोंधळ उडाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंडळातील सदस्यांनी पोलिस विभागाचा निषेध नोंदवत देवी पुढे नेण्यास नकार दिला. अखेर पोलिसांनी समजूत घातल्यानंतर प्रकरण निवळले, तर काही ठिकाणी चाकूहल्ला, महिलेला मारहाण, तर एका चौकात महिलांची छेड काढणाऱ्या तिघांना पोलिसांनी बदडले. एकंदरीत अशा घटना यावर्षीच घडल्याने मिरवणुकीला गालबोट लागल्याची चर्चा शहरात रंगली होती. हा प्रकार घडताना काही लोकप्रतिनिधी मात्र, बघ्याची भूमिका घेत होते. सर्व प्रकार झाल्यानंतर ते दाखल झाले. त्यामुळे रोष व्यक्त होत होता.
एका महिलेस अज्ञातांनी बदडले
छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या थोडे दूर अंतरावर काही महिला पायदळ जात असताना, युवकांचे टोळके रस्त्याने जाताना शिवीगाळ करत चालले होते. ते सर्व युवक मद्यधुंद होते. महिलांनी युवकांना शिवीगाळ करण्यास हटकले असता, युवकांनी एका महिलेला चांगलीच मारहाण केली. महिलेने आरडाओरड केली. पोलिस पोहोचले. पण, तोपर्यंत त्या युवकांनी तेथून पळ काढला. या घटनेदरम्यान काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तो निवळला.
आर्वी नाका परिसरात झाला चाकूहल्ला
आर्वी नाका परिसरातील देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान ढोल- ताशाच्या तालावर नाचणाऱ्या मुलांसोबत काही युवकांचा वाद झाला. दरम्यान, इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या मारी नामक युवकाने एका युवकाला चाकू मारून त्यास जखमी केल्याची घटना घडली.
पावडे चौकात तिघांना बदडले, नागा साधूसोबतही चाळे
पावडे चौकात काही पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर होते. दरम्यान, चौकातील काही युवक महिला व तरुणींची छेड काढत असल्याचे त्यांना दिसून आले. पोलिसांनी त्यांना हटकताच मद्यधुंद युवकांनी पोलिसांवरच धाव घेतली. मग काय, 'खाकी'ने चांगलाच हिसका दाखवून त्यांना पळवून लावले, तसेच आर्वी नाक्याच्या देवी मिरवणुकीत सहभागी असलेल्या एका नागा साधूला गोंडप्लॉट येथील काही युवकांनी धक्काबुक्की केली. त्यांच्याशी अश्लील चाळे केले. पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. पण, त्या युवकांनी तेथून पळ काढला होता. पोलिसांच्या देखरेखीत पुन्हा मिरवणुकीला सुरुवात झाली.
टि-शर्ट काढून नोंदविला निषेध, माफीनंतर मिरवणूक गेली पुढे
पत्रावळी चौकातील दुर्गामातेच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही पोलिसांनी मंडळातील सदस्यांशी धक्काबुक्की केली. विशेष म्हणजे मंडळात असलेल्या लहान मुलांशीही धक्काबुक्की झाल्याने पोलिसां- विरोधात मंडळातील सदस्यांनी रोष व्यक्त केला. दोन पोलिस कर्मचारीही किरकोळ जखमी झाले. मंडळाची देवी शिवाजी महाराज चौकात पोहचल्यावर सदस्यांनी आपआपल्या टि-शर्ट काढून निषेध नोंदवत आधी एसपी साहेबांना बोलवा नंतरच देवी पुढे नेऊ, असा पवित्रा घेतला. काही वेळातच उपवि- भागीय पोलिस अधिकारी, अपर पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक तेथे दाखल झाले. त्यांनी मंडळातील सदस्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंडळातील सदस्यांनी आपला रोष व्यक्त केला. पोलिसांनी घडलेल्या प्रकाराबाबत माफी मागितली आणि त्यानंतरच देवी विसर्जनासाठी पुढे नेण्यात आली. त्यानंतर शांतता निर्माण झाली.