गचाळ कार्यप्रणालीमुळे हजारो क्विंटल तूर बेवारस
By admin | Published: May 13, 2017 01:15 AM2017-05-13T01:15:19+5:302017-05-13T01:15:19+5:30
शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा उसना आव आणून नाफेडद्वारे शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली.
अवकाळी पावसाने केली व्यवस्थेची पोलखोल
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा उसना आव आणून नाफेडद्वारे शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. त्यातही शासकीय यंत्रणेच्या ‘नव दिन मे ढाई कोस’ या म्हणी प्रमाणे कासवगतीनेच तुरीची खरेदी करण्यात आली. २४२७.९७ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असताना गुरूवारी दुपारी ४ वाजता अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात शेकडो क्विंटल तूर भिजल्याचे समजते. परंतु, बाजार समितीकडून घटनेला दुजोरा दिल्या जात नव्हता.
तुरीची संथगतीने होणारी खरेदी पाहून शेतकऱ्यांचा आक्रोश वाढला. त्यानंतर नाफेडनेही २२ एप्रिलपासून खरेदी बंद केली. ११ मेपर्यंत स्थानिय कृउबात एकूण २४२७.९७ क्विंटल तूरीच खरेदी करण्यात आली. ही तूर मार्केट मध्येच पडलेली असतानाच गुरूवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मुसळदार पाऊस झाला. यात शेकडो क्विंटल तुरी भिजल्याचे समजते. परंतु बाजार समितीद्वारे या घटनेला दुजोरा मिळू शकला नाही. नाफेडची तूर खरेदी बंद झाल्यानंतर राज्य शासनाने बाजार समितीच्या माध्यमातून ३ मे २०१७ पासून तूर खरेदी सुरू केली आहे. ११ मेपर्यंत २४२७.९७ क्विंटल तूर खरेदी केल्याचे कृउबाचे सचिव राजपूत यांनी सांगितले. खरेदी केलेली तूर बाजार समितीचे यार्डामध्ये पडून असून गुरूवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे यार्डात पाणी साचले. तुरीच्या पोत्याखालून पाणी गेल्याने खालील भागातील तूर ओली होणे स्वाभाविक आहे. बहुतांश तुरीचे पोते ताडपत्रीने झाकले असले तरी शेकडो क्विंटल तूर भिजल्याचा अंदाज आहे. या संदर्भात कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजपूत यांनी सांगितले की, तुरीचे ढीग नसून ही तूर पोत्यामध्ये भरली आहे. या पोत्यावर मोठमोठ्या ताडपत्र्या झाकल्याने पावसामुळे तूर ओली होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची मागणी
नाफेडतर्फे २२ एप्रिल पासून तूर खरेदी बंद केली. मार्केट यार्डमध्ये व शेतकऱ्यांकडे अजुनही बरीच तूर पडुन आहे. नाफेडची खरेदी बंद होताच नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना माल द्यावा लागत आहे. शेतकऱ्यांना १००० ते १२०० रूपयाचे नुकसान सहन करावे लागत असल्याने तसेच शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल कृउबाच्या यार्डमध्ये खरेदी करावा अशी मागणी भाजपाचे मंगेश झाडे, राजकुमार पनपालीया, कपील शुक्ला यांनी सभापती खडसेंकडे केली.
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळावे -देशमुख
मुख्यमंत्र्यांनी तुर खरेदीत मुदत वाढ देण्याचे जाहीर केले होते;पण शहानिशा केली असता अद्यापही कुठलाही आदेश संबंधीतांना प्राप्त नाही. आश्वासन पाळण्याची मागणी वर्धा कृउबाचे उपसभापती पांडुरंग देशमुख यांनी केली.