हजारो क्विंटल तुरीला आली मोड
By admin | Published: June 12, 2017 01:53 AM2017-06-12T01:53:40+5:302017-06-12T01:53:40+5:30
नाफेडनंतर शासनासाठी महाराष्ट्र राज्य पणन महासंघ राज्यात तूर खरेदी करीत आहे; पण यात गोंधळाची स्थिती असल्याने ....
बाजार समितीत दुर्गंधी : नियोजनाच्या अभावामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नाफेडनंतर शासनासाठी महाराष्ट्र राज्य पणन महासंघ राज्यात तूर खरेदी करीत आहे; पण यात गोंधळाची स्थिती असल्याने लाखो रुपयांच्या तुरी सडण्याच्या मार्गावर आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हजारो क्विंटल तुरीला मोड आली आहे. पोत्यातच तुरीला कोंब फुटल्याने बाजार समितीत दुर्गंधी पसरली आहे.
शासकीय तूर खरेदीचा बाजार समित्यांमध्ये गोंधळ पाहावयास मिळतो. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तूर बाजारात आणली; पण तोकड्या व्यवस्थेमुळे तब्बल १५ ते २० दिवसांनी मोजमाप व खरेदी होत होती. मान्सूनपूर्व पावसाचे नियोजन करण्यात आले नाही. परिणामी, गोंधळ आणखी वाढला. मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे आवारात असलेल्या तुरीला पोत्यांतच मोड आली आहे. यात सुमारे ४०० ते ५०० क्विंटल तुरी खराब झाल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर नाफेड, एफसीआय आणि पणन महासंघाने आतापर्यंत नाकारली. चाळणीने गाळून तूर स्वीकारण्यात आली. आता हजारो क्विंटल तूर पावसामुळे सडत आहे. मग, या नुकसानाला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पणन महासंघ तुरीची खरेदी तर करीत आहे; पण गोदामांची व्यवस्थाच करण्यात आली नाही. वर्धेत खरेदी केलेल्या तुरी दीडशे किमीच्या वर अंतर ब्रह्मपुरी येथील वखार महामंडळाच्या गोदामात साठविल्या जात आहे. शिवाय वाहतूक व्यवस्थाही तोकडीच आहे. परिणामी, हजारो क्विंटलचा खरेदी केलेला माल बाजार समितीच्या आवारातच पडून आहे. सुमारे ११ हजार ५०० क्विंटल तूर शेडमध्ये व आवारात आहे. यापैकी अर्धी तूर उचलण्यात आली असली तरी ५०० क्विंटलच्या वर तुरीला मोड आली आहे.
शेतकऱ्यांची तूर गुणवत्ता नसल्याचे कारण देत नाकारण्यात आली असताना खरेदी केलेली तूर मात्र सडत आहे. यार्डात सुमारे ५०० क्विंटल तूर खुल्या आवारात शिल्लक आहे तर शेडमध्ये असलेली हजारो क्विंटल तूर खालच्या भागातून पाणी लागत असल्याने धोक्यात आली आहे. पाच शेडमध्ये असलेली सुमारे सात ते आठ हजार क्विंटल तुरीची लगेच उचल केली नाही तर ती देखील सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा मार्केटींग अधिकारी, खरेदी-विक्री संघाद्वारे अद्याप गोदामांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. शिवाय वाहतूक व्यवस्थाही नाही. परिणामी, शासनाला तूर खरेदीत कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गोदामांची व्यवस्था होत असताना पणन महासंघाकडून पुढाकार घेतला जात नसल्याचेही बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे.
करारानुसार त्याच दिवशी माल उचलणे गरजेचे
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर महाराष्ट्र राज्य पणन महासंघामार्फत तुरीची खरेदी करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तूर बाजारात आणली; पण खरेदीसाठी तब्बल १५ ते २० दिवस बाजार समितीतच मुक्काम ठोकावा लागला. अत्यंत धिम्यागतीने खरेदीची प्रक्रिया राबविली गेली. शिवाय खरेदी केलेला माल त्वरित उचललाही गेला नाही. यामुळे बाजार समितीच्या पाचही शेडमध्ये खरेदी केलेली तूर ठेवण्यात आली आहे. पणन महासंघाने तब्बल १३ हजार ८०० क्विंटल तुरीची खरेदी केली; पण तोकड्या वाहतूक व्यवस्थेमुळे तथा गोदाम रिक्त नसल्याने तो माल बाजार समितीतच पडून आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात तुरीची नासाडी होत आहे. तीन ते चार दिवसांच्या पावसामुळे ५०० क्विंटलपेक्षा अधिक तुरीला मोड आली असून शेडमधील खाली असलेले पोतेही पाणी लागत असल्याने सडण्याची शक्यता खरेदी-विक्री संघाचे कर्मचाऱ्यांनी वर्तविली आहे. यामुळे तुरीची त्वरित उचल करणे गरजेचे आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना सेवा देण्यास बाध्य आहे, खरेदीदारांना नव्हे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनशी झालेल्या तूर खरेदीच्या करारात याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यांची व्यवस्था त्यांना करावयाची आहे. खरेदी केलेला माल त्याच दिवशी उचलणे, ही त्यांची जबाबदारी आहे. असे असले तरी गोदाम रिकामे नसल्याने बाजार समितीने त्यांना पाचही शेड उपलब्ध करून दिले. शिवाय पावसाचा धोका असल्याने दोन दिवस ताडपत्री दिल्या. शिवाय सात-आठ हजार रुपयांचे प्लास्टिक खरेदी करून देण्यात आले. त्यांनी खरेदी केलेला माल गोदामातून परत येत आहे. बाजार समितीने अन्य गोदाम संचालकांशी डीएमओचा संपर्क करून दिला; पण माल उचलण्यात आला नाही. सर्वत्र खरेदी करण्यात आलेली तूर असल्याने अन्य व्यवहार बंद आहे.
- समीर पेंडके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धा.
महाराष्ट्र राज्य पणन महासंघाची अधिकृत तूर खरेदी सुरू आहे. खुल्या यार्डमध्ये ३०० ते ४०० पोते ओले झालेत. ते पोते पलटवून सुरक्षित ठिकाणी ठेवत आहोत. यार्डवर ताडपत्री, गोदाम आदींची व्यवस्था नसल्याने माल ओला होत आहे. ताडपत्री दोन दिवसांसाठी पुरविण्यात आल्या. दर अधिक असल्याने ताडपत्री अधिक दिवस देऊ शकत नसल्याचे सांगत बाजार समितीने प्लास्टिक दिले; पण ते पुरेसे नाही. माल उचलण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने आणि खरेदी अधिक होत असल्याने नुकसान होत आहे. आणखी सात-आठ हजार क्विंटल माल असून तोही खराब होण्याची शक्यता आहे. तत्सम पत्रही देण्यात आले आहे.
- अशोक रणनवरे, कर्मचारी, खरेदी-विक्री संघ, वर्धा.