हजारो वृक्षांचा जातोय बळी
By admin | Published: May 29, 2015 01:52 AM2015-05-29T01:52:45+5:302015-05-29T01:52:45+5:30
सामाजिक वनीकरण विभाग देवळीअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कोळोणा ते अडेगाव रस्त्याच्या दुतर्फा एक हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली.
धुरे जाळणे झाडांच्या मूळावर : लागवड योजनेतील वृक्षांवर संक्रांत
विजयगोपाल : सामाजिक वनीकरण विभाग देवळीअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कोळोणा ते अडेगाव रस्त्याच्या दुतर्फा एक हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली. यातील काही झाडे दोन ते तीन फुट उंच झाली आहेत; पण ही झाडे आगीत भस्मसात होत असल्याचे दिसते. यामुळे शासनाचे लाखो रुपये व्यर्थ जात असून योजनेचा बट्याबोळ होत आहे.
केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्य शासनाच्यावतीने शतकोटी वृक्षलागवड योजना राबविण्यात येत आहे. यासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करून देत आहे. सामाजिक वनीकरण विभाग देवळीतर्फे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जून २०१४ मध्ये कोळोणा ते अडेगाव रस्त्याच्या दुतर्फा एक हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली. यात सप्तपर्णी, गुलमोहर, कशिया, पिंपळ आदी प्रजातींच्या वृक्षांचा समावेश आहे. सध्या लागवड केलेली रोपे तीन ते चार फुट उंच झाली आहेत. संबंधित विभागाने या झाडांचे संरक्षण करता यावे म्हणून कठडे लावणे गरजेचे होते. सध्या शेतशिवारात आंतर मशागत व काडी कचरा पेटविण्याची कामे सुरू आहेत. अनेक शेतकरी शेतातील धुरे पेटवून देतात. ही आग पसयरून रस्त्यापर्यंत येत असल्याने झाडे जळत असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या झाडांचे आयुष्य धोक्यात आले आहे. या झाडांना उन्हाळ्यात नियमित पाणी देणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसन नाही. पाणी मिळत नसल्याने अनेक झाडांनी माना टाकल्या आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा बट्याबोळ होत आहे. यात लाखो रुपयांचा निधीही व्यर्थ खर्च होत असल्याचे दिसते. ग्रामपंचायत अंतर्गत लावलेल्या झाडांचीही तशीच अवस्था आहे. झाडांना कठडेच नसल्याने अनेक झाडे गुरांनी फस्त केली आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)