धाम नदीचे पावित्र्य धोक्यात
By admin | Published: May 10, 2014 12:28 AM2014-05-10T00:28:23+5:302014-05-10T00:28:23+5:30
वर्धा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही प्रसिद्ध असलेल्या पवनार येथील धाम नदी परिसरातील विनोबा भावे यांचा परमधाम आश्रम परिसर ...
पराग मगर - वर्धा
संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही प्रसिद्ध असलेल्या पवनार येथील धाम नदी परिसरातील विनोबा भावे यांचा परमधाम आश्रम परिसर व धाम नदीचे पात्र सध्या मद्यपींच्या विळख्यात सापडले आहेत. येथे पर्यटकांना दारूच्या बाटल्या व घाणीचे दर्शन नित्याचेच झाले आहे. पवनार येथील सुप्रसिद्ध विनोबा आश्रम हा धाम नदीकाठावर वसलेला आहे. हा नदी परिसर काळ्या खडकांनी व्यापला आहे. त्यामधून खळखळत बाराही महिने पाणी वाहात असल्याने पर्यटकांसाठी हे ठिकाण आवडीचे आहे. त्याच प्रकारे नदीच्या दुसर्या काठावर मंदिरांनी व्याप्त नंदीखेडा परिसर आहे. काहीच वर्षांपूर्वी या भागाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. पर्यटकांसह दसव्याचा विधी करणार्यांचीही नंदीखेडा परिसरात गर्दी असते. वर्षभर जत्रा भरत असल्याचे चित्र आहे. पण चांगले वातावरण व भरपूर एकांत यामुळे हा भाग दारुडे व आंबटशौकिनांचाही अड्डा बनत चालला आहे. नदीवरील समाधी परिसर तसेच नंदीखेडा परिसरात रात्री रंगत असलेल्या दारूच्या पार्ट्या पहाटे फिरायला गेल्यावर पडून दिसत असलेल्या दारूच्या बाटल्या, पाण्याचे पाऊच, टिस्पोजेबल ग्लास, चिप्सचे पॅकेट आदींवरून लक्षात येते. यामध्ये गावठी दारूसह देशी विदेशी दारूचा समावेश असल्याचे बाटल्यांवरून लक्षात येते. फिरण्याच्या निमित्ताने बाहेरून येत असलेल्यांचाही यात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याकडे लक्ष देत येथील असा प्रकार बंद करावा अशी मागणी वारंवार ग्रामस्थ व पर्यटक करीत असतात. यावरून काही काळ याकडे लक्ष स्थानिक प्रशासन थातुर मातुर कारवाई कारते. पण काही कावधी जाताच पुन्हा हा प्रकार सुरू होतो. या परिसरात महिला वर्गही सायंकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी तसेच नंदीखेडा परिसरात दर्शनासाठी येत असतात. पण मद्यपिंच्या हैदोसामुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागतो. अनेकदा दारूच्या बाटल्या फुटल्याने पायाला ईजाही होतात. प्लास्टिकचे ग्लास, पाईच हवेने उडत नदीपात्रात पसरत असल्याने दुर्गंधी सुटली आहे. नंदीखेडा मंदिर परिसरात मागच्या बाजुला बाटल्या, पाणी पाऊच आणि ग्लासेसचा खच नेहमीच असतो.