अल्पवयीन मुलीला जाळण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 06:00 AM2020-03-12T06:00:00+5:302020-03-12T06:00:27+5:30
१५ दिवसांपूर्वी प्रफुल्ल नामक युवकाने अल्पवयीन मुलीला मोबाईल भेट दिला होता. काही दिवस दोघेही मोबाईलवर बोलू लागले. दरम्यान मुलीच्या वडिलांना मोबाईल दिसल्याने ७ फेब्रुवारीला मुलीच्या वडिलांनी प्रफुल्ल नामक युवकाला हिंगणघाट येथील तहसील कार्यालयात नेत ५०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर मी यानंतर मुलीला त्रास देणार नाही, असे साक्षीदारांसमक्ष लिहून घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : संपूर्ण देशाला हादरा देणारे हिंगणघाट येथील जळीत प्रकरण ताजे तसतानाच भेटायला येण्यास नकार दिल्याने मुलीला जाळून टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तक्रारीनंतर उघडकीस आला आहे. ही घटना सातेफळ येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
१५ दिवसांपूर्वी प्रफुल्ल नामक युवकाने अल्पवयीन मुलीला मोबाईल भेट दिला होता. काही दिवस दोघेही मोबाईलवर बोलू लागले. दरम्यान मुलीच्या वडिलांना मोबाईल दिसल्याने ७ फेब्रुवारीला मुलीच्या वडिलांनी प्रफुल्ल नामक युवकाला हिंगणघाट येथील तहसील कार्यालयात नेत ५०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर मी यानंतर मुलीला त्रास देणार नाही, असे साक्षीदारांसमक्ष लिहून घेतले. ७ मार्चला दुपारी १ वाजताच्या सुमारास मुलगी रस्त्याने घरी जात असताना प्रफुल्ल याने मुलीला थांबवून तु माझ्यासोबत का बोलत नाही, मला भेटायला ये, तु जोपर्यंत माझ्याशी बोलशील नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही, असे म्हटले. दरम्यान मुलगी घरी निघून गेली. रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास युवतीने प्रफुल्ल याला फोन करून यानंतर मला त्रास द्यायचा नाही, मी तुला भेटण्यास येणार नाही, असे म्हटले असता प्रफुल्लने मुलीस जीवंत जाळण्याची धमकी दिली. दरम्यान मुलीने ही बाब घरच्यांना सांगितली. त्यानंतर हिंगणघाट पोलीस स्टेशन गाठून तक्रार देण्यात आली. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीहून हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चॉकलेटचे आमिष देत चिमुकलीशी छेडछाड
केळझर : चॉकलेट आणि फुग्याचे आमिष दाखवून चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. दहेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात सचिन रामप्रसाद लिहितकर याने आठ वर्षाच्या चिमुकलीला चॉकलेट आणि फुग्याचे आमिष दिले. दरम्यान पीडिता तेथून जात असताना सचिनने पीडितेचा हात पकडून घरात नेत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी तक्रारीवरून दहेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून युवतीचा विनयभंग
देवळी : युवतीच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून युवतीचा विनयभंग केल्याची घटना वायगाव (नि.) येथे उघडकीस आली. अनोळखी व्यक्तीने युवतीच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन अश्लील मेसेज पोस्ट करीत युवतीच्या मैत्रिणींचे फोटो संकलीत करून प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध केले. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरूद्ध देवळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पारडी (हेटी) मध्ये महिलेशी असभ्य वर्तन
तळेगाव (श्या.पंत.) : घरात प्रवेश करीत असभ्य वर्तन करीत महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना पारडी (हेटी) येथे सोमवारी घडली. राहुल धुर्वे याने पीडितेच्या घरात प्रवेश करीत तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडा-ओरडा केला असता त्याने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेचा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान आरोपी राहुल धुर्वे याने तेथून पळ काढला. पीडितेने राहुल धुर्वे याच्या घरी जात त्याच्या आईकडे तक्रार केली. त्यावेळी आरोपीच्या आईने पीडितेस हाकलून लावले. या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पुलगाव : बारावीचा पेपर दिल्यानंतर परतीचा प्रवास करीत असलेल्या अल्पवयीन मुलीला वाटेत अडवून तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना सोमवारी विजयगोपाल येथे घडली. समाजशास्त्र विषयाचा पेपर दिल्यानंतर पीडिता ही घरी जात होती. दरम्यान विजयगोपाल येथील पेट्रोलपंपाजवळ रोशन फग्गुलाल शाहू रा. इंदिरानगर याने पीडितेला अडविले. शिवाय तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने घरी परतल्यावर संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पुलगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल करण्यात आली आहे.