साडेतीन वर्षाच्या बिबट्याची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:12 AM2018-12-15T00:12:51+5:302018-12-15T00:13:18+5:30
बेलोरा जंगलातील रायपूर शिवारात धुमाकुळ घालणाऱ्या साडेतील वर्षाच्या बिबट मादीची हत्या करण्यात आली. शिवाय मृतदेह दुसरीकडे बैलबंडीने नेऊन टाकल्याचा प्रकार तब्बल चार दिवसानंतर उघडकीस आला. सदर घटना उजेडात येताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : बेलोरा जंगलातील रायपूर शिवारात धुमाकुळ घालणाऱ्या साडेतील वर्षाच्या बिबट मादीची हत्या करण्यात आली. शिवाय मृतदेह दुसरीकडे बैलबंडीने नेऊन टाकल्याचा प्रकार तब्बल चार दिवसानंतर उघडकीस आला. सदर घटना उजेडात येताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शवविच्छेदन करून बिबट्याचा मृतदेह जाळण्यात आला. विद्युत शॉक देऊन या बिबट मादीची हत्या करण्यात आल्याची चर्चा असून त्याची कुठेही वाच्छता झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अप्पर वर्धा धरणाच्या पायथ्याशी बेलोरा गाव आहे. गावाला लागून मोठ्या प्रमाणात जंगल आहे. जंगलाशेजारीच शेत जमिनी आहेत. शेतकरी शेतात जाण्यासाठी बिबट मादीच्या दहशतीमुळे घाबरत होते. या भागातील अनेक गाय, कालवड, गोरे ठार वन्यप्राण्यांद्वारे करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम आखून कुणीतरी शेतकऱ्यांच्या शेतातील तारेच्या कुंपनात विद्युत प्रवास सोडला. त्याचाच स्पर्श झाल्याने सदर बिबट मादीचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात होत आहे. शिवाय त्याबाबत काही पुरावेही वन विभागाच्या अधिकाºयांच्या हाती लागले आहेत. सदर प्रकाराची कुठेही वाच्चता न करता मृतक बिबट अज्ञात शेतकºयांनी बैलबंडीने रायपुर मौजातील नाल्याजवळच्या पांदणीत एका झुडपात आणून टाकले. शेतकऱ्यांना ये-जा करताना दिसले नाही. मात्र, चार दिवसानंतर शुक्रवारी सकाळी परिसरात दुर्गंधी सुटल्याने हा प्रकार उजेडात आला. सदर घटनेची माहिती गडलिंग नामक शेतकऱ्यांने ग्रामस्थांना देत वन विभागाच्या अधिकाºयांना दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, वनरक्षक रसिका अवथळे यांच्यासह २५ वनकर्मचाºयांचा ताफा माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी बिबटाचा मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. तर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एच. कांबळे, साहुरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जे. डी. भांगरे, आर्वीचे पशुवैद्यकीय अधिकारी बी. डी. कोहाड यांनी शवविच्छेदन केले. पंचनामा करताना तज्ज्ञांना मृत बिबट मादी साडेतीन वर्षाची आणि तिच्या डाव्या पायाला व मानेला जीवंत विद्युत ताराचा प्रवाह लागून मृत्यू झाल्याचे आढळून आले. सरते शेवटी बिबटाचा मृतदेह जाळण्यात आला. याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी चौकशी सुरू केली आहे. चौकशी झाल्यावर सदर मादीला कुणी शेताच्या कुंपन तारांमध्ये विद्युत प्रवाहित करून मारले. शिवाय बैलबंडीने कुठून आणले आदी विविध प्रश्नांना पुर्ण विराम मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
बैलबंडीचे वास्तव गुलदस्त्यातच
ज्या ठिकाणी बिबटास मारले त्या ठिकाणापासुन रायपूरच्या नाल्यातील पांदणांच्या झुडुपात मृत बिबट बैलबंडीने आणले असावे असा कयास बांधल्या जात आहे; पण सध्यातरी वास्तव गुलदस्त्यातच आहे.
बिबट मादी मृतावस्थेत असल्याची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात विद्युत करंट दिल्याचा मार आढळून आला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच तपासाची दिशा ठरेल.
- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी (शहीद).
मृत बिबट मादी साडेतीन वर्षाची आहे. विद्युत शॉकच्या जखमा डाव्या पायाला व मनोला आढळून आल्या आहे. मास कुजल्याने शवविच्छेदनात बरीच अडचण गेली. अहवाल आल्यावर वस्तुस्थिती सांगता येईल.
- डॉ. एस. एच. कांबळे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी आष्टी (शहीद).