साडेतीन हजार वृक्षांना आगीची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:55 PM2019-03-06T23:55:44+5:302019-03-06T23:56:37+5:30
शहरातील आयटीआय टेकडीवरील जल शुद्धीकरण केंद्रा लगत निसर्ग सेवा प्रकल्पाचे आॅक्सिजन पार्क असून या पार्कमध्ये बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजतादरम्यान अचानक आग लागली. वाळलेले गवत असल्याने ही आग अल्पावधीतच पसरली. यात जवळपास साडेतीन हजार वृक्षांना आस लागली असून काही वृक्ष जळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील आयटीआय टेकडीवरील जल शुद्धीकरण केंद्रा लगत निसर्ग सेवा प्रकल्पाचे आॅक्सिजन पार्क असून या पार्कमध्ये बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजतादरम्यान अचानक आग लागली. वाळलेले गवत असल्याने ही आग अल्पावधीतच पसरली. यात जवळपास साडेतीन हजार वृक्षांना आस लागली असून काही वृक्ष जळाले. नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविली. येथे नेहमीच टवाळखोराचा डेरा राहत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
आयटीआय कॉलेजच्या बाजुला असलेल्या टेकडीवर निसर्ग सेवा समितीने २००० पासून वृक्षांची लागवड व संगोपण केले. सध्या या परिसरात ११ हजार वृक्षांची लागवड केली असून परिसर हिरवागार झाला आहे. निसर्ग सेवा समितीसह काही निसर्गप्रेमी आपल्या श्रमदानातून वृक्षांचे संगोपण करीत आहे; पण काही समाजकंटकांना ही हिरवळ पाहावली जात नाही की काय? असाच प्रश्न वारंवार लागणाऱ्या आगीमुळे निर्माण होत आहे. यापूर्वीही याच परिसरात आग लागल्याने वृक्षांचे नुकसान झाले. चार ते पाच दिवसापूर्वी हनुमान टेकडीवरील वैद्यकीय जनजागृती मंचाने तयार केलेल्या आॅक्सिजन पार्कमध्येही आग लागल्याने अनेक वृक्षांना झळ पोहोचली होती. आज पुन्हा बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास म्हाडा कॉलनीलगतच्या भागातील टेकडीवर आग लागल्याचे नागरिकांना दिसले. त्यामुळे काहींनी आगीच्या दिशेने धाव घेत नगरसेवक निलेश किटे यांना माहिती दिली. किटे यांनी लागलीच न.प.चा अग्निशामन बंब पाठविला. त्यांनी टेकडीच्या खालच्या बाजुने पाण्याचा मारा करीत आग विझविली. त्यानंतर जलशुद्धी केंद्रालगतच्या वरील बाजुने जात आगीवर नियंत्रण मिळविले. पण, या आगीत जवळपास साडेतीन हजार वृक्षांना झळ पोहोचल्याचे निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी सांगितले. आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही.पण, वारंवार होणाऱ्या घटनेमुळे यावर आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
जलशुद्धी केंद्र परिसरात शुकशुकाट
आयटीआय टेकडीवरील जलशुद्धीकेंद्रालगतच्या परिसरात आग लागल्यानंतर अनेकांनी त्या दिशेने धाव घेतली. परंतु जलशुद्धीकेंद्र परिसरात शुकशुकाट होता. ही आग वरच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच अग्निशमन दल तेथे पोहोचल्यानंतर सारेच धाऊन आले.
निसर्ग सेवा प्रकल्पाच्या दर्शनी भागाला असलेल्या गेटमधून अग्निशमन बंब आत नेण्याकरिता गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.