उपचाराच्या नावाखाली तांत्रिक विद्येचा वापर; तरुणाचा गळा आवळून खून, तीन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 10:28 AM2022-05-20T10:28:27+5:302022-05-20T18:06:15+5:30
मृत तरुण मानसिकरित्या अस्वस्थ असल्यामुळे त्याला उपचाराकरिता या आरोपींकडे आणण्यात आले होते. परंतु, आरोपींनी संगनमत करून त्याचा तांत्रिक विद्येप्रमाणे उपचार करून गळा आवळून खून केला.
देऊरवाडा (आर्वी) : उपचाराच्या नावाखाली तांत्रिक विद्येचा वापर करीत २२ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना येथील विठ्ठल वार्डात उघडकीस आली आहे. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुरुवारी रात्री उशिरा तीन आरोपींना अटक केली आहे.
अब्दुल रहीम अब्दुल मजिद (६०) अब्दुल जुनेद अब्दुल रहीम (२२)अब्दुल जमीर अब्दुल रहीम (२०) सर्व रा. विठ्ठल वॉर्ड आर्वी, अशी आरोपींची नावे आहेत. तर, गणेश तुकाराम सोनकुसरे ( ४९, रा. रविदास मंदिर जवळ बेल्पुरा अमरावती) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गणेश तुकाराम सोनकुसरे हे अमरावती येथे राहतात. त्यांचा मोठा मुलगा रितिक हा मानसिक रुग्ण असून उपचार सुरू होता. ते आपल्या मुलाला मुलाला उपचारासाठी विठ्ठल वॉर्डातील रहिवासी असलेल्या या तिघांकडे घेऊन आले. तांत्रिक विद्येचा वापर करून आम्ही त्याला बरे करूच असे चित्र आरोपींनी निर्माण केले. त्यांनी मुलावर तांत्रिक उपचार केले व त्यानंतर संगनमत करून तरुणाचा गळा आवळून खून केला.
म्हणे जिन सवार...झोपू द्या त्याला
आरोपींनी रितिक याची गळा आवळून हत्या केल्यावर रितिकला त्याच्या वडिलांच्या हवाली करण्यात आले. पण आपले पितळ उघडे पडू नये तसेच रितिक गतप्राण झाला याची कुठलीही शंका मृताच्या वडिलांना येऊ नये म्हणून आरोपींनी रितिकवर जीन सवार आहे. तो सध्या झोपून असून त्याला झोपू द्या. आम्ही पूजा करतो. तो बरा होईल असे सांगितले. मात्र, अमरावतीच्या दिशेने जात असलेल्या रितिकच्या वडिलांना रितिकच्या गळ्यावर ओरबडल्यागत दिसल्याने त्यांनी अमरावतीत दाखल होताच त्याला थेट इरविन हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती रितिकला मृत घोषित करताच रितिकच्या वडिलांनाही धक्काच बसला. त्यानंतर गणेश सोनकुसरे यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
पोलीस अधीक्षकांनी केली घटनास्थळाची पाहणी
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके, आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली.