येळाकेळी येथील तीन गिट्टी खदानींंना ठोकले सील
By admin | Published: March 15, 2016 03:56 AM2016-03-15T03:56:34+5:302016-03-15T03:56:34+5:30
येळाकेळी परिसरात सुरू असलेल्या तीनही गिट्टी खदान मालकांनी परवान्याचे नूतनीकरण न करताच काम सुरू ठेवल्याची
सेलू : येळाकेळी परिसरात सुरू असलेल्या तीनही गिट्टी खदान मालकांनी परवान्याचे नूतनीकरण न करताच काम सुरू ठेवल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली. शिवाय या खाण मालकांवर महसूलची थकबाकीही होती. यावरून सोमवारी तहसीलदारांनी चमूसह येथे धाड घातली. त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नसल्याने या तीनही खदानीला सिल ठोकण्याची कारवाई केली.
दुर्गासिंह धनवाल, ओमप्रकाश वैरागडे व योगेश कुळकर्णी यांच्या मालकीच्या खदानी असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. शिवाय या खदानीबाबत नागरिकांच्या व परिसरातील शाळांनी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या.
प्राप्त माहितीनुसार, खदान चालविताना शासनाकडून मिळत असलेल्या परवान्याचे ठाराविक कालावधीनंतर नूतनीकरण करणे गरजेचे आहे. असे असताना या तीनही खदान मालकांनी त्यांची मुदत संपल्यानंतर त्याचे कुठलेही नूतनीकरण न करता उत्खननाचे काम सुरूच ठेवले. याची माहिती सेलू येथील तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांना मिळाली. यावरून त्यांनी आज नायब तहसीलदार अजय झिले, झडशीचे मंडळ अधिकारी डेहणे, तलाठी चौधरी, कनिष्ठ लिपीक तलाठी आगलावे व डोईफोडे यांच्यासह पोलीस शिपाई जावेद यांनी खदानीवर धाड घातली. कागदपत्र तपासले असता खदानीचे नूतनीकरण झाले नसल्याचे दिसून आले. यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)
एक वर्ष होवूनही परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही. तसेच महसूल थकबाकीबाबत मागणी नोटीस देवूनही थकबाकी जमा केली नाही. त्यामुळे सील लावण्याची कारवाई करण्यात आली.
- डॉ. रवींद्र होळी, तहसीलदार सेलू,