पक्ष्यांची शिकार करणारे तिघे अटकेत
By admin | Published: February 13, 2017 12:40 AM2017-02-13T00:40:58+5:302017-02-13T00:40:58+5:30
येथील शांतीनगर परिसरात पाणकोंबड्यांची शिकार करण्यात येत असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या मदतीने पिपल्स फॉर अॅनिमलने धाड मारली.
शिकारीचे साहित्य जप्त : सहा जिवंत पाणकोंबड्या सापडल्या
वर्धा : येथील शांतीनगर परिसरात पाणकोंबड्यांची शिकार करण्यात येत असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या मदतीने पिपल्स फॉर अॅनिमलने धाड मारली. यात तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून शिकारीचे साहित्य आणि सहा जिवंत पाणकोंबड्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली.
रामा दगड़ू चव्हाण, माइकल सुरेश भोसले, सूरज सुरेश भोसले तिघेही रा.पुलफैल अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेले तिघेही नेहमीच ससे, घोरपड़ी, बदक व पाणकोंबड्या पकडत असल्याची माहिती वनविभागाने दिली. या तिघांजवळून ससे, जंगली प्राणी व पक्षी पकडण्याकारिता वापरण्यात येत असलेले मोठे जाळे, धारदार शस्त्रे व पिंजरे आदि साहित्य जप्त करण्यात आले. शिवाय त्यांच्याजवळून एका पोत्यातून सहा नग जिवंत पाणकोंबड्या (वाटर हेन) जप्त करण्यात आल्या आहेत. वनविभागाच्या ताब्यात असलेले शिकारी या कोंबड्या बाजारात विक्री करीत असल्याची माहिती आहे. यावर कारवाई करण्याची गरज आहे.
वनविभागाने या तिघांवरही वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही वनविभागाचे बिट गार्ड बी.डब्लू. इंगळे, आर. पी. धनविज तसेच पिपल्स फॉर एनिमल्सचे कौस्तुभ गावंडे, लखन येवले, अजिंक्य काळे यांनी केली.(प्रतिनिधी)
इतवारात २०० ते ३०० रुपये जोडीने विक्री
या शिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या पाणकोंबडीची एक जोडी रविवारी बाजाराचा दिवस असल्याने इतवारा परिसरात २०० ते ३०० रुपयांत विकली जाते. अशा शिकाऱ्याजवळ हे पक्षी पकडण्याकरिता विशेष प्रकारचे पिंजरे व जाळे असताता. असे शिकारी जिल्ह्यात कुठेही दिसून आल्यास नागरिकांनी याची माहिती त्वरित वन विभाग किंवा पीपल फॉर एनिमल्स वर्धा यांना देण्यात यावी, असे कळविण्यात आले आहे.