एकाच रात्री तीन घरफोड्या
By admin | Published: November 9, 2016 12:51 AM2016-11-09T00:51:12+5:302016-11-09T00:51:12+5:30
शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. सोमवारी एकाच रात्री सिंदी (मेघे) परिसरातील तराळे ले-आऊट येथे तीन घरफोड्या झाल्या.
शहरात घरफोड्यांचे सत्र : नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
वर्धा : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. सोमवारी एकाच रात्री सिंदी (मेघे) परिसरातील तराळे ले-आऊट येथे तीन घरफोड्या झाल्या. यात चोरट्यांनी किती रुपयांचा मुद्देमाल लंपास केला, हे अद्याप उघड झाले नाही. चोरीची माहिती मिळताच पोलिसांकडून नित्याप्रमाणे पंचनामा करून गुन्हे दाखल करण्याची कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. शहरालगत असलेल्या भागात एकाच रात्री घडलेल्या या घरफोड्यांमुळे चांगलीच खळबळ माजली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी या चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्याची मागणी शहरात जोर धरत आहे.
तराळे ले-आऊट येथील दुर्गा मंदिर परिसरातील भारती प्रवीण धोटे यांच्या घरी चोरी झाल्याचे आज सकाळी उघड झाले. धोटे यांच्या घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरावर हात साफ केला. या घरातून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख लंपास केली. या चोरीचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असतानाच याच भागातील रमेश जगताप यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी जगताप यांच्या घराकडे मोर्चा वळविला. येथेही चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत साहित्य लंपास केल्याचे समोर आहे. या प्रकरणात चोरट्यांच्या हाती विशेष ऐवज लागला नसून केवळ सहा हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांनी लंपास केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. या चोरीचा तपास सुरू असताना सायंकाळच्या सुमारास याच भागात तिसरी चोरी झाल्याचे उघड झाले. ही चोरी लोणारे यांच्या घरी झाली असून त्यांनी सायंकाळी रामनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. यामुळे या चोरीत नेमका किती रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला याचा खुलासा झाला नाही. या तीनही चोरीतील चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत एकच असून घरांवर लक्ष ठेवत कुलूपबंद घर हेरून चोरी करणारी टोळी येथे कार्यरत असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)
गुन्हे नोंदविण्यात आघाडीवर असलेले पोलीस तपासात मात्र मागासच
चोऱ्यांचे गुन्हे नोंदविण्यात वर्धा पोलीस आघाडीवर असले तरी चोरट्यांचा छडा लावण्यात मात्र त्यांचा घाम निघत असल्याचे सध्या दिसत आहे. वर्धा शहरातच नव्हे तर जिल्ह्यात चोरट्यांकडून घरातील ऐवज लंपास करण्याच्या घटना रोजच ठाण्यात दाखल होत आहे. एवढेच नव्हे तर घरात शिरून चाकूचा धाक दाखवून महिलेसमक्ष घरातील साहित्य लंपास केल्याची घटना आर्वी येथे नुकतीच घडली. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. असे असताना या चोऱ्यांचा छडा लावण्यात मात्र पोलीस यंत्रणेला अपयश येत असल्याचेच दिसून आले आहे.
जिल्ह्यात होत असलेल्या चोरी व लुटमारीसह अन्य गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा कार्यरत आहे; मात्र गुन्हे शाखेचे पोलीस केवळ दारू पकडण्यातच कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात पोलिसांवर हावी होत असलेल्या चोरट्यांवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांना लक्ष देण्याची गरज आहे.