नगर पंचायत सभेत तीन कोटींची कामे मंजूर
By Admin | Published: March 10, 2016 02:46 AM2016-03-10T02:46:21+5:302016-03-10T02:46:21+5:30
राज्य शासनाकडून प्राप्त शहीदभूमी विकास आराखड्यासाठी पाचपैकी तीन कोटी रुपयांच्या शहर विकासाची कामे बुधवारी झालेल्या सभेत मंजूर झाली.
मुख्याधिकारी गैरहजर : दोन कोटींच्या कामांबाबत मागविले मार्गदर्शन
आष्टी (श.) : राज्य शासनाकडून प्राप्त शहीदभूमी विकास आराखड्यासाठी पाचपैकी तीन कोटी रुपयांच्या शहर विकासाची कामे बुधवारी झालेल्या सभेत मंजूर झाली. उर्वरित दोन कोटी रुपये शहीद स्मारक सौंदर्यीकरणाच्या कामांना देता येतात काय, याबाबत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांचे मार्गदर्शन मागवून मंजुरी देणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मीरा येणूरकर यांनी दिली. भाजपच्या नगरसेवकांनी सदर ठराव निरर्थक असल्याचा आरोप केला.
बुधवारी नगरपंचायत सभागृहात दुपारी १.१५ वाजता सभा सुरू झाली. प्रारंभी भाजपाच्या सहा नगरसेवकांनी मागील सभेत विषय मंजूर झाल्यावर आता तोच विषय परत घेता येतो काय, यावर आवाज उठविला. यावेळी नगराध्यक्ष येणूरकर यांनी मागील सभेत सदर विषय झालाच नाही. विकास कामाबाबत पाहणी झाली नाही. मग, ठराव मंजूर झाला, असे म्हणणे उचित नाही. यामुळे आजच्या सभेत यावर बोला, असे सांगितले. यानंतर पाचपैकी तीन कोटी रुपये शहराच्या विकासावर खर्च करण्याचे ठरले. सदर ठरावामध्ये कामे मंजूर केली असून निधी कोणत्या कामासाठी किती लागणार, याची पाहणी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता करतील. इस्टीमेट किती रुपयांचे होईल, याचे नियोजन त्यांच्या स्तरावर करण्याचे ठरले.
उर्वरित दोन कोटी रुपये जुने पोलीस ठाणे जेथे स्वातंत्र्य रणसंग्राम घडला (जुने हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय) त्या पवित्र ठिकाणी राष्ट्रीय शहीद स्मारक दुरूस्ती व सौंदर्यीकरण या कामाबाबत जिल्हाधिकारी सलील यांना मार्गदर्शन मागण्यात येईल. यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नगराध्यक्षांनी दिली.
महत्त्वाच्या सभेला मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर गैरहजर होत्या. मागील सभेपासून मुख्याधिकारी येथे आल्या नाहीत. आर्थिक व्यवहार त्यांच्या अधिनस्त असल्याने नगर पंचायत सभागृहाला माहिती होत नाही. वीज वितरण कंपनीचे थकीत ४ लाख २० हजार रुपये अदा केले नाही. यामुळे मंगळवाी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होणार आहे. याविरूद्ध नगराध्यक्षासह बाराही नगरसेवक जिल्हाधिकारी सलील यांना भेटणार असल्याची माहिती नगराध्यक्ष येणूरकर यांनी दिली. सभेत नगरपंचायत प्रशासनाकडून कर्मचारी रवी होले यांनी वाचन केले.
या कामांवर होणार खर्च
यात कपिलेश्वर देवस्थान रस्ता, टेकडीवाले बाबा दर्गा परिसरात कव्वाली कार्यक्रम स्टेज, दर्ग्याच्या बाजूचे फ्लोरींग, लेंडी नदीला संरक्षण भिंत व पुलाचे बांधकाम, जुन्या बसस्थानकाजवळील स्मशानभूमी, नवीन बसस्थानक परिसरातील स्मशानभूमी, बारीपुरा समाजाची स्मशानभूमी, सहा शहिदांना भंडाग्नी दिला त्या शहिदांच्या दफनभूमीचे बांधकाम व सौदर्यीकरण या कामांसाठी ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.