गोवर्धनच्या मारेकऱ्यांना तीन दिवसांचा पीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:09 PM2018-12-09T23:09:11+5:302018-12-09T23:09:38+5:30
रानडुक्कराची शिकार करताना बंदूकीतून निघालेली गोळी थेट शेतकºयाला लागली. यात परतोडा येथील शेतकरी गोवर्धन डोबले याचा जागीच मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : रानडुक्कराची शिकार करताना बंदूकीतून निघालेली गोळी थेट शेतकºयाला लागली. यात परतोडा येथील शेतकरी गोवर्धन डोबले याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी लिडरसिंग चरणसिंग बावरी (४४), अनुपसिंग अचलसिंग बावरी (३५) व अशोकसिंग अमरसिंग बावरी (४४) यांना तळेगाव येथील शिख बेड्यावरून अटक करून त्यांची तीन दिवसीय पोलीस कोठडी मिळविली आहे.
इंग्रजकालीन बनावटीच्या भरमार बंदुकीचा वापर करून परतोडा शिवारात रानडुक्कराची शिकार केली जात होती. रानडुक्कराची शिकार करताना थेट शेतकरीच गतप्राण झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांनी आपल्या सहकाºयांसह घटनास्थळ गाठले. त्यावेळी संतप्त जमावाने पूर्वी आरोपींना जेरबंद करा तेव्हाच मृतदेहाला हात लावू देऊ असा पवित्रा घेतला होता. संतप्त जमावाच्या भावना लक्षात घेवून तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आपल्या हालचालींना गती देत आरोपी लिडरसिंग चरणसिंग बावरी (४४), अनुपसिंग अचलसिंग बावरी (३५) व अशोकसिंग अमरसिंग बावरी (४४) यांना शनिवारी रात्री तळेगाव (श्या.पं.) येथील शिख बेड्यावरून ताब्यात घेतले. सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तज्ज्ञांच्या हस्ते शवविच्छेदन करण्यासाठी रविवारी मृतक गोवर्धन डोबले याचा मृतदेह आर्वी येथील शासकीय रुग्णालयातून पोलिसांच्या बंदोबस्तात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आला. तेथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाºयांच्या चमूद्वारे गोवर्धनचे शवविच्छेदन करण्यात आले. तर अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करून तिनही आरोपींची तीन दिवसीय पोलीस कोठडी तळेगाव पोलिसांनी मिळविली आहे. पोलीस कोठडीदरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली बंदूक पोलीस जप्त करणार आहे.