जिल्ह्यात आगीच्या तीन घटना; सहा लाखांवर नुकसान

By admin | Published: April 13, 2017 01:44 AM2017-04-13T01:44:27+5:302017-04-13T01:44:27+5:30

जिल्ह्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत गोठ्यांसह घर जळून खाक झाले. या घटना बुधवारी घडल्या.

Three fire incidents in the district; Damage to six lakhs | जिल्ह्यात आगीच्या तीन घटना; सहा लाखांवर नुकसान

जिल्ह्यात आगीच्या तीन घटना; सहा लाखांवर नुकसान

Next

मजरा गाव थोडक्यात बचावले : आगीमुळे व्यवसाय हिरावला
वर्धा : जिल्ह्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत गोठ्यांसह घर जळून खाक झाले. या घटना बुधवारी घडल्या. यात सहा लाख रुपयांवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तीनही घटनांचा तलाठी, पोलिसांनी पंचनामा केला असून अहवाल तहसीलदारांना सादर केला आहे.
वर्धा ते आर्वी मार्गावरील मजरा गावाजवळ खुशाल बोंदरे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागली. यात शेती साहित्य जळून खाक झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. बोंदरे यांचे शेत गावाला लागून आहे. सायंकाळी ५ वाजता गोठ्याला आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण आग गावाच्या दिशेने पसरत चालली होती. दरम्यान, ठाणेदार प्रशांत पांडे यांना माहिती मिळताच त्यांनी अरावली कंपनीतून पाण्याचे टँकर बोलवून स्वत: सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत गावाकडे जाणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविले. यात गोठ्यातील बैलगाडी, वखर, डवरे व कुटार खाक झाले. पोलिसांनी सतर्कता बाळगत टँकर बोलविल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी जमादार बावले, शिपाई प्रीतम इंगळे व ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने बैलजोडी झाडाखाली बांधली असल्याने ती सुखरूप बचावली.(लोकमत न्यूज नेटवर्क)

गोठ्याला आग, एक लाखाचे नुकसान
अल्लीपूर : एकूर्ली शिवारातील ठोठरी भागातील कल्पना रमेश महाकाळकर यांच्या शेतातील बंड्याला रात्री आग लागली. यात शेतीची अवजारे, साहित्य, कुटार, पीव्हीसी पाईप ५० नग टिनपत्रे जळाली. गुरे लांब असल्याने बचावली. जिवीत हानी झाली नसली तरी १ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पटवारी व अल्लीपूर पोलिसांना घटनेचा पंचनामा केला.

घराला आग, बिछायतचे साहित्य भस्मसात
सेवाग्राम : घराला मध्यरात्री लागलेल्या आगीत बिछायतचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना हमदापूर येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. यात गुरूदेव बजरंग बावनगडे यांचे चार ते साडेचार लाखांचे नुकसान झाले. हमदापूर येथील बावनगडे यांचे टपरीसारखे लहान घर असून घरालगत बिछायतचे सामान ठेवण्यासाठी टिनाचे शेड केले होते. मंगळवारी रात्री गुरूदेव तसेच आई, पत्नी, दोन मुले झोपी गेले. दरम्यान, मध्यरात्री अचानक घराला आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी ग्रामस्थांना जागे करून आग विझविली; पण तोपर्यंत बिछायतचे कापड, खुर्च्या, दरी, मॅट, स्टेज डेकोरेशन, पंखे, लाईटस, वायर्स आदी साहित्य जळून खाक झाले. यात त्यांचे ४ ते ४.५० लाखांचे नुकसान झाले. जीवित हानी झाली नसली तरी जगण्याचे साधन हरविल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकले नाही. तलाठी शेंद्रे यांनी पंचनामा केला. सरपंच प्रीती भोयर, उपसरपंच संजय देशमुख, जि.प. सदस्य सुनील शेंडे, पं.स. सदस्य वर्षा पाटील आदींनी भेट दिली. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली.

Web Title: Three fire incidents in the district; Damage to six lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.