विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा; देवळीत रंगणार तीनशे पहिलवानांची दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 04:22 PM2022-03-31T16:22:01+5:302022-03-31T16:32:59+5:30
देवळी येथे १ व २ एप्रिल रोजी ३६ वी विदर्भ केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व विदर्भस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
देवळी (वर्धा) : खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत देवळी येथे १ व २ एप्रिल रोजी ३६ वी विदर्भ केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व विदर्भस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी विदर्भातील अकरा जिल्ह्यांतून तीनशे पहिलवान उपस्थित राहणार असून, दोन दिवस कुस्त्यांची दंगल रंगणार आहे.
विदर्भ केसरी अजिंक्यपद स्पर्धा पुरुषांच्या ५३, ५७, ६१, ६५ व ७० किलो वजनगटात तर विदर्भ केसरीची लढत ७० ते १०५ किलो वजन गटात होणार आहे. महिलांच्या कुस्त्या ४०, ४४, ४८, ५१, ५५, ५९ व ६३ किलो वजन गटात तसेच विदर्भ महिला केसरीची लढत ६३ ते ७५ किलो वजन गटात रंगणार आहे. कुमार गटातील पहिलवानांच्या कुस्त्या ४०, ४४, ४८, ५१, ५५, ५९ व ६३ किलो गटात खेळल्या जाणार आहेत.
या स्पर्धा देवळीतील रामदास तडस इनडोअर स्टेडियम येथे होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून दोन याप्रमाणे विदर्भ केसरीचे स्पर्धक यात भाग घेणार आहेत. महापालिका स्तरावर शहर व ग्रामीण भागातून प्रत्येकी दोन संघांचा सहभाग राहणार आहे. पहिलवानांच्या जाण्या-येण्याचा खर्च तसेच निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन विदर्भ विभागीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते तसेच केंद्रीय दारूगोळा भांडार पुलगावचे ब्रिगेडियर विनय नायर, हिंद केसरी सुनील साळुंके, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, कुस्तीगीर संघटनेचे सचिव गणेश कोहळे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट व भाजपचे प्रदेश सचिव राजेश बकाने यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. बक्षीस वितरण माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते तसेच केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.
विदर्भ केसरीला मिळणार चांदीची गदा
देवळीत आठव्यांदा या स्पर्धेचे आयोजन होत असून, या वेळी तीनशे पहिलवानांचा सहभाग राहणार आहे. तसेच विदर्भ केसरीचा किताब मिळविणाऱ्या पहिलवानाला चांदीची गदा, मानपट्टा आणि ५१ हजार रोख देऊन सन्मानित केले जाणार आहे. उपविजेत्याला व पुरुष व महिला गटातील विजेत्या पहिलवानांचा रोख पारितोषिक व चषक देऊन गौरव केला जाईल.
-रामदास तडस, खासदार