‘प्रभारीं’च्या खांद्यावरून शहरातील तीन महत्त्वाच्या कार्यालयांचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 05:00 AM2022-05-22T05:00:00+5:302022-05-22T05:00:25+5:30
कारंजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची बदली झाल्यापासून ते पद रिक्त आहे. याचा पदभार नायब तहसीलदार किशोर साळवे यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या ते प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कामकाज सांभाळत आहेत. मात्र, अनेक महत्त्वाच्या समस्यांबाबत ठोस निर्णय घेऊ शकत नाही. ग्रामीण रुग्णालयाचा कारभार मागील १५ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाविना सुरू आहे.
अरूण फाळके
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घाडगे) : ग्रामीण भागासह शहराचा कारभार सुरळीत चालण्यासाठी महत्त्वाच्या कार्यालयांत नियमित कार्यालयप्रमुख अधिकारी असणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण व शहरी व्यवस्थापन आणि कार्यालयाचा कारभार सुरळीत आणि गतिशीलपणे चालू शकतो. मात्र, कारंजा शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय आणि नगरपंचायतीच्या कार्यालयाला अनेक वर्षांपासून नियमित कार्यालयप्रमुख नसल्याने या तिन्ही कार्यालयाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावरून हाकणे सुरू आहे. यामुळे कामकाजावर विपरित परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
नियमित कार्यालयप्रमुख नसल्याने अनेकदा महत्त्वाचे निर्णय घेणे, कर्मचाऱ्यांकडून शासकीय योजना राबवून घेणे, कामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करणे आदी प्रभारी अधिकाऱ्यांना कठीण जाते. संबंधित कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांकडून प्रमुख अधिकारीच नसल्याने कर्तव्य बजावताना दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम कामकाजावर होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कारंजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची बदली झाल्यापासून ते पद रिक्त आहे. याचा पदभार नायब तहसीलदार किशोर साळवे यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या ते प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कामकाज सांभाळत आहेत. मात्र, अनेक महत्त्वाच्या समस्यांबाबत ठोस निर्णय घेऊ शकत नाही. ग्रामीण रुग्णालयाचा कारभार मागील १५ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाविना सुरू आहे. सध्या या रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. प्रभाकर वंजारी हे कामकाज सांभाळत आहे, तर ग्रामीण भागाच्या विकासाची नाळ ज्या कार्यालयाशी जुळली असते, असे महत्त्वाचे समजले जाणाऱ्या पंचायत समितीचा कारभारदेखील प्रभारी म्हणून कृषी अधिकारी पंधरे सांभाळत आहेत.
नगर पंचायतीला नियमित मुख्याधिकारी नसल्याने शहराचा कारभार ढेपाळला आहे. पाण्याची समस्या भीषण आहे. अग्निशमन दलाबाबत ते निर्णय घेऊ शकले नाही. क्रीडा संकुल, अतिक्रमण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतील प्रसाधनगृह व स्वच्छतागृह बांधकाम आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ते करू शकले नाही, हे विशेष. याकडे प्रशासनाने लक्ष देत तत्काळ कायमस्वरुपी अधिकारी देण्याची गरज आहे.
मुख्यालयी राहण्यास अडचणी
- ग्रामीण रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांना वर्धा आणि नागपूर येथे अनेकदा मीटिंगला जावे लागत असल्याने ते आपल्या मूळ पदाला न्याय देऊ शकत नाहीत. सतत मुख्यालयी राहू शकत नसल्याने ग्रामीण रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
- तिन्ही प्रमुख कार्यालयातील कारभार प्रभारींच्या खांद्यावरून हाकणे सुरू असल्याने नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून आपला राजकीय प्रभाव वापरून तिन्ही प्रमुख कार्यालयातील रिक्त पदावर नियमित अधिकाऱ्याची वर्णी लावावी, अशी मागणी गावातील नागरिकांकडून केली जात असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
तालुक्यातील सर्वच विभागात बदलीचे ‘वारे’
- सध्या सर्वच विभागात बदलीचे वारे वाहू लागल्यामुळे या तिन्ही प्रमुख कार्यालयातील रिक्त पदांवर नियमित अधिकाऱ्यांची वर्णी लागेल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, अद्याप कुणाचाही आदेश निघाला नसल्याने सध्या तरी हा कारभार प्रभारींच्या खांद्यावरून रामभरोसे सुरू राहणार असल्याचे चिन्हे दिसत आहे.