रस्त्यावर सापडलेले ३ लाख रुपये केले पोलिसांच्या स्वाधीन
By admin | Published: April 10, 2017 01:28 AM2017-04-10T01:28:15+5:302017-04-10T01:28:15+5:30
सर्वत्र पैशाकरिता अराजकता माजली असताना अजुनही कुठेतरी प्रामाणिकता जिवंत आहे, याचा प्रत्यय हिंगणघाटात आला.
हिंगणघाट : सर्वत्र पैशाकरिता अराजकता माजली असताना अजुनही कुठेतरी प्रामाणिकता जिवंत आहे, याचा प्रत्यय हिंगणघाटात आला. येथील रस्त्यावर पडलेली तब्बल ३ लाखांची रोकड दोन युवकांनी थेट पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनीही त्यांच्या या कार्याची दखल घेतली. ठाणेदार साळवी यांनी ठाण्यातच त्यांचा सत्कार केला. प्रामाणिकता कायम असल्याची जाण देणाऱ्या या दोन युवकांची नावे सुमीत सुरेश चन्ने (२६) व महेश नानाजी जाधव (३२) रा. कोचर वॉर्ड अशी आहेत.
बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास येथील तहसील कार्यालयासमोर सुमित व महेश हे दोघे दुचकीने जात असताना त्यांना रस्त्यावर एक थैली पडलेली दिसून आली. त्यांनी ती थैली उघडून पाहिली असता त्यात नोटांचे बंडल असल्याचे दिसले. त्यांनी लगेच ती थैली घेवून पोलीस ठाणे गाठले. या थैलीतील राजधानी या कापड दुकानाची देयके होती. ठाणेदार साळवी यांनी त्या देयकावरील भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कापड व्यावसायिक मोटवानी यांना बोलविले. सदर रक्कम त्यांचीच असल्याची शहानिशा केल्यानंतर थैलीतील एकूण ३ लाख ३ हजार ३५० रुपयांची रक्कम मोटवानी यांच्या स्वाधीन केली. मोटवानी यांनीही पोलीस ठाणे गाठत रक्कम स्वीकारत या युवकांचे आभार मानले.
ठाणेदार साळवी यांनी या दोन्ही युवकांचा ठाण्यातच शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी जमादार गजानन काळे, समाजसेवी रवींद्र डुंगरवाल, प्रशांत धायवनकर, राहुल देवगीरकर, रमेश कुंभारे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)