वैमनस्यातून तीन लाखांची घरफोडी
By admin | Published: June 14, 2017 12:51 AM2017-06-14T00:51:11+5:302017-06-14T00:51:11+5:30
आपसी वैमनस्याचा वचपा काढण्यासाठी घरफोडी करून तीन लाखांचा ऐवज पळविल्याची अजब घटना वर्धेत उघड झाली.
अनर्थ टळला : आॅटो, मोपेड व घरातील साहित्याची तोडफोड
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आपसी वैमनस्याचा वचपा काढण्यासाठी घरफोडी करून तीन लाखांचा ऐवज पळविल्याची अजब घटना वर्धेत उघड झाली. या वादातून चोरट्याने दोन आॅटो, दुचाकी व घरातील साहित्याची तोडफोड करून ३५ हजार रुपयांच्या रोखीसह सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास बोरगाव (मेघे) येथील साहु ले-आऊट परिसरात घडली.
बोरगाव येथील निलेश मानकर व राजेश जयस्वाल या दोघांत काही कारणातून वाद झाला होता. या वादातूनच महिलेच्या तक्रारीवरून निलेश याच्यावर शहर पोलिसांत भादंविच्या कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकारामुळे निर्माण झालेल्या वैमनस्यातून यापूर्वीही जयस्वाल याने मानकर याची दुचाकी पेटविली होती.
सोमवारी निलेशची पत्नी कल्याणी मानकर हिच्या आजी चंद्रभागा नेहारे यांच्या घरचा भवानी माता मंदिरात जेवणाचा कार्यक्रम होता. दुपारी निलेश मंदिरात जेवण करण्यासाठी गेला होता. तेथे जयस्वाल व मानकर या दोघांत पुन्हा वाद झाला. यानंतर तो घरी आला. दरम्यान, रात्री १२.१५ वाजता जयस्वालसह चौघांनी मानकरचे घर गाठले. दार ठोठावले; पण दार न उघडता कुटुंबातील सदस्यांनी भीतीपोटी मागील दाराने पळ काढला. काही वेळ दार न उघडल्याने चौघेही निघून गेले. यामुळे मानकर कुटुंबीय दाराला कुलूप लावून सासुरवाडीला गेले. काही वेळाने पुन्हा चौघेही मानकर यांच्या घरावर गेले. प्रथम घरासमोर उभा असलेला आॅटो, दुचाकीची तोडफोड केली. यानंतर दार तोडून घरातील दोन आलमाऱ्या, टीव्ही, फ्रीज, सोफा, दिवाणची तोडफोड केली. शिवाय कपाटातील ३५ हजार रुपये रोख, सोन्याचा गोप, आंगठी, चैन असा ऐवज घेऊन पळ काढला. यात मानकर कुटुंबीयांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत सकाळी ६ वाजता माहिती मिळताच निलेश व कुटुंबीय घरी पोहोचले असता हा प्रकार दिसून आला. याबाबत कल्याणी निलेश मानकर (२४) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले यांनी पाहणी केली. या प्रकरणी भादंविच्या कलम ४४९, ४५२, ४५७, ३८०, ४२७, ५०४, ५०६, ३४ तसेच आर्म अॅक्ट ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यात राजेश स्वामीनारायण जयस्वाल व इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील एक आरोपी वृत्त लिहिस्तोवर फरार होता.
गळ्याला चाकू लावून फोडला आॅटो
निलेश मानकर याच्या घरी विजय देविदास ढोरे हा युवक भाड्याने राहतो. तो आॅटो चालवून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी रात्री घरासमोर आॅटो उभा करून तो झोपला होता. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास चौघे जण तेथे आले. यावेळी विजयच्या गळ्याला चाकू लावून निलेश मानकरबाबत चौकशी केली. यानंतर त्याला झोपण्यास सांगून बाहेर असलेल्या आॅटोची तोडफोड केले. यात युवकाचे दहा हजार रुपयाचे नुकसान केले.
आपसी वैमनस्यातून घडलेला हा प्रकार आहे. यात सुमारे ७२ हजार रुपयांचे नुकसान केले असून ७४ हजार ४०० रुपयांचे सोने व रोख लंपास केली आहे. आरोपींच्या शोधार्थ दोन पथके पाठविली आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.
- माधव पडिले, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा.